कोपरगाव तालुक्यात पीक विम्याची तुटपुंजी भरपाई; शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त
कोपरगाव: विमा कंपन्यांनी मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या पीकांची नुकसान भरपाई म्हणून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम दिली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मागील वर्षी संपुर्ण पावसाळ्यात अतिशय कमी पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका, बाजरी इत्यादी पिके करपून गेली होती. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च करून खरीपातील ही सर्व पिके उभी केली होती. परंतु पावसाने दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पिकाचे उत्पादन आलेच नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या कर्जबाजारी झाला.
हेदेखील वाचा- मतदारांनी उस्फुर्तपणे मतदानाचा हक्क बजावावा; दापोली उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन
शेतीपिकांसाठी झालेला खर्च सुद्धा त्या पिकाच्या उत्पादनातून निघाला नाही. मागील वर्षी बहुतांशी सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता. २०२३ मध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची २५% रक्कम अदा करण्यात आली होती. उर्वरित रक्कम देण्यासाठी पिक विमा कंपनीला तब्बल एक वर्ष उलटून गेले. आता रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, मात्र ही रक्कम अतिशय कमी आहे.
काही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून ही रक्कम जमा झालेली नाही. कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारीमध्ये १०५ रुपये प्रति गुंठा याप्रमाणे ही पीक विमा भरपाई रक्कम जमा झालेली आहे. तर तालुक्याच्या पश्चिम भागातील चासनळी येथील शेतकऱ्यांना १७५ रुपये प्रति गुंठा याप्रमाणे पीक विम्याची भरपाई देण्यात आलेली आहे.
कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात वेगवेगळ्या स्वरूपात पिकविमा रक्कम देऊन विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या हातात वाटाण्याच्या अक्षता देण्याचे काम केलेले आहे. कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी पिक विमा कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता विधानसभा मतदारसंघांमध्ये २७० रुपये प्रति गुंठा याप्रमाणे पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई अदा केलेली आहे. तसेच नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना २०० रुपये प्रति गुंठा याप्रमाणे भरपाई देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार, एकनाथ शिंदेंनी नेमकी कोणाला दिली धमकी?
परंतु कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना १०५ रुपये आणि १७५ रुपये प्रति गुंठा अशी भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम या विमा कंपनीने केलेले आहे. अगदी शेजारी असणाऱ्या गावांमध्ये फक्त तालुका बदलल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरपाईच्या रक्कमेमध्ये तफावत आढळून आल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकर्यांनी संताप व्यक्त केलेला आहे.
राहाता व कोपरगाव तालुक्यातील शेजारी असणाऱ्या गावांमधील पर्जन्यमान सारखे असताना सुद्धा अशा प्रकारे विमा कंपन्यांनी भरपाई देताना कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सावत्रपणाची वागणूक देऊन बळीराजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांचे व आमचे सारख्याच प्रमाणावर नुकसान झालेले असताना सुद्धा पीक विमा कंपनीने भरपाईची तुटपुंजी रक्कम खात्यावर वर्ग करुन आमच्यावर एवढा मोठा अन्याय का केला असा संतप्त सवाल कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी सदर विमा कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी दबाव आणण्याची मागणी केली आहे.