सातारा : सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे सामान्य जनता, शिवप्रेमी, शालेय विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी शनिवारपासून खुली करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी दोन हजार शिवप्रेमींनी प्रदर्शनाला भेट दिल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.
लंडन येथून आणलेल्या वाघनखे आणि शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचs मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. शनिवारपासून ही वाघनखे पाहण्यासाठी सामान्य जनतेसाठी खुली करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील शिवप्रेमींसाठी ही नवीन पर्वणी ठरणार आहे. जिल्ह्यातील शाळेतील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाघनखे मोफत पहावयास मिळणार आहेत. याव्यतिरिक्त प्रौढ व्यक्तींना नाममात्र १० रुपये शुल्क व पंधरा वर्षाखालील मुलांना ५ रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये शिवकालीन शस्त्रे, निरनिराळी वस्त्रे, मोडी लिपीतील मजकूरांची पत्र, राजघराण्यातील १८ व्या शतकातील तख्त, दुर्मीळ शस्त्रे, विविध प्रकारच्या बंदूका अशा सर्व प्रकारच्या ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा हा साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे पाहायला मिळणार आहे. हे शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत चालू राहणार असून, सोमवारी साप्ताहिक सुट्टी राहणार असल्याची माहिती अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.