
Navi Mumbai News: वाशीत गीता अपार्टमेंटच्या सज्ज्याचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी
वाशीतील धोकादायक गीता अपार्टमेंटच्या खिडकीचा सज्जा कोसळून 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत 42 वर्षीय महिला गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सावन वैश्य / नवी मुंबई
वाशी सेक्टर-११ येथील जुहूगाव परिसरातील गीता अपार्टमेंट या धोकादायक इमारतीच्या खिडकीच्या सज्ज्याचा भाग रविवारी सायंकाळी अचानक कोसळला. या भीषण दुर्घटनेत एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली असल्याचे समोर आले आहे. जखमी महिलेवर विनम्र स्वराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जुहूगाव येथील शिवसेना शाखेजवळील अपना ढाबा परिसरातील तीन मजली गीता अपार्टमेंट ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली असून तिचा निवासी वापर बंद करण्यात आला आहे. मात्र, इमारतीच्या तळमजल्यावर व्यावसायिक वापर सुरू आहे. रविवारी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या खिडकीचा सज्जा अचानक कोसळला. यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या राजेश शेट्टी (वय ३५) यांच्या डोक्यावर सज्जा कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच मानसी धारेकर (वय ४२, रा. जुहूगाव) या देखील गंभीर जखमी झाल्या.
घटनास्थळालगतच असलेल्या श्रीराम हॉस्पिटलमधील डॉ. जी. एस. संदीप यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींवर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजेश शेट्टी यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांनी तातडीने रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाच्या मदत पथकाला पाचारण केले. त्यानंतर दोघांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच राजेश शेट्टी यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, तर मानसी धारेकर यांच्यावर विनम्र स्वराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस, अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनेचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत. या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा इमारतींची तातडीने संरचनात्मक तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.