File Photo : Hanuman Murti
बल्लारपूर : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर असलेल्या एका मंदिरातील हनुमानमूर्तीची विटंबना केल्याची घटना शनिवारी (दि. 19) घडली. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून, चंद्रपूर येथील आरोपीला शुक्रवारी (दि. 25) अटक करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : आता तर हद्दच झाली! हातात चाकू पकडून खिळ्यावर बॅलेन्स अन् पाठीवर गोनी; तरूणाचा धोकादायक स्टंट
बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्गावर भिवकुंड परिसरात हनुमान मंदिर आहे. या मंदिरातील हनुमान मूर्तीची आरोपीने रागाच्या भरात विटंबना करून तोडफोड केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती धक्का देणारी आहे. चंद्रपूर येथे राहणारा आरोपी व त्याच्या पत्नीत वाद झाला होता. त्यामुळे त्याची पत्नी बल्लारपूर येथे नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेली होती. या प्रकाराचा आरोपीला पश्चाताप झाला.
शनिवारी (दि. 19) रात्री आरोपी दुचाकीने बल्लारपूरला जाण्यास निघाला. मात्र, सैनिक शाळेच्या वळणावर त्याच्या दुचाकीत बिघाड झाला. यामुळे तो संतप्त झाला. त्याने दुचाकी हनुमान मंदिराजवळ ठेवली. चंद्रपूरकडे जाण्यासाठी आरोपीने प्रयत्न केला. मात्र, रात्रीची वेळ असल्याने एकही वाहन थांबत नव्हते. या रागाच्या भरात त्याने मंदिरातील हनुमानमूर्तीची विटंबना केली.
विहिंपने केला होता रास्ता रोको
मूर्तीची विटंबना झाल्याने बल्लारपूर येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला होता. रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीला तातडीने अटक करावी, म्हणून बल्लारपूर शहर बंदची हाक दिली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस प्रशासनाने तपास करून हनुमान मूर्तीची विटंबना करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या आरोपीला अटक केली.