लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंभार गल्लीत भीषण आग! गरीब कुटुंबाचा संसार खाक
Dharashiv News : उमरगा,(वा)शहरातील कुंभार गल्ली (कुंभार पट्टी) भागात रविवारी (दि.८) रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास मंगलबाई चंद्रकांत गायकवाड यांच्या घराला अचानक आग लागली. आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने घटना घडली तेव्हा घरात कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, अत्यंत दाटीवाटीच्या वस्तीत घडलेल्या या घटनेवेळी स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या अफाट धाडसामुळे पुढील अनर्थ टळला असून शेकडो घरे भस्मसात होण्यापासून बचावली.
रविवारी संपूर्ण शहरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह सुरू असताना सायंकाळी सातच्या सुमारास मंगलबाई गायकवाड यांच्या बंद घराला अचानक आग लागली. घरातून धूर व आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. पाहता पाहता आगीने अत्यंत रौद्र रूप धारण केले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कुंभार गल्ली हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने ही आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरण्याची दाट भीती निर्माण झाली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील शंकर सोनकांबळे,सचिन सुतके,मारुती खराते,किरण बनसोडे,दिगंबर भालेराव,विलास खराते,धीरज कांबळे, अनिल व्हंताळकर, प्रदीप कांबळे,हनुमंत बनसोडे यांच्यासह अनेक धाडसी तरुणांनी तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. स्वतःचा जीव धोक्यात घालून या तरुणांनी पाण्याचा मारा करत आग इतर घरांमध्ये पसरू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न केले. तरुणांच्या या तत्परतेमुळे आग बऱ्याच अंशी आटोक्यात आली. त्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत उर्वरित सर्व आग पूर्णपणे विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक बाबा मस्के व सामाजिक कार्यकर्ते सुशील दळगडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळण्यासाठी मदत केली. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार ज्ञानराज चौगुले, बळीमामा सुरवसे, अमर देशटवार आदींनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पीडित गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि तातडीची आर्थिक मदत सुपूर्द केली.
सोमवारी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, उपाध्यक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधी व मान्यवरांनीही घटनास्थळाला भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबाची पाहणी केली व दिलासा दिला.या आगीत गरीब कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाल्यामुळे कुटुंबीय उघड्यावर आले असून, शासनाने तातडीने पंचनामा करून या कुटुंबाला भरीव शासकीय मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.
Ans: उमरगा शहरातील कुंभार गल्ली (कुंभार पट्टी) परिसरात मंगलबाई चंद्रकांत गायकवाड यांच्या घराला आग लागली.
Ans: प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. मात्र, आगीचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.






