
आरक्षणाच्या मुद्द्यावर उमरग्यात भीम पॅंथर संघटनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : भीम पँथर सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने आज उमरगा येथे केंद्रातील भाजप सरकारविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मूळ संविधानिक रचनेत हस्तक्षेप करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रतीक बबन सुर्यवंशी यांनी यावेळी बोलताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणाच्या मूलभूत संविधानिक ढाच्याला हात घालण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली. तसेच सरकारने भूमिका बदलली नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संघर्ष राजेंद्र भालेराव यांनी अमरण उपोषणाचा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. आंदोलनात एमआयएमचे लोहारा तालुकाध्यक्ष अमीरहमजा खोटेपड यांच्यासह धनराज सोनवणे, मनोज मुखे, स्वप्निल मुखे, पंकज गायकवाड, नंदू सोनवणे, फुलचंद जामगे, विकास पाटील, सिद्धार्थ भालेराव, प्रतीक भालेराव आदी उपस्थित होते.
उमरगा शहरात आरक्षणाच्या मुद्द्यावर भीम पॅंथर संघटनेच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा, आरक्षणासंबंधी प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात आणि शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, या मागण्यांसाठी आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले होते.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी प्रतीकात्मक स्वरूपात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात संताप व्यक्त करत सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर तडजोड होणार नसल्याचा इशारा दिला.
भीम पॅंथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आरक्षण हा समाजातील मागास व वंचित घटकांच्या हक्काचा प्रश्न असून त्यावर कोणत्याही प्रकारची गदा येऊ देणार नाही. शासनाने समाजाच्या भावना लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत प्रशासनाला निवेदन सादर केले. या आंदोलनाची शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून विविध सामाजिक संघटनांनीही या प्रश्नावर आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे.
Kalyan News : “मुस्लिम नागरिकांना आम्ही घरं देणार नाही” ; कोनगावात अजब फतवा