
खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर; दोन दिवसांत निर्णय, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा
शीतलकुमार शिंदे, धाराशिव : जिल्ह्यात पावसाअभावी खरीप हंगाम अक्षरशः हातातून गेला असून आता रब्बी हंगामावरही संकट घोंघावत आहे. अनेक जलस्रोत कोरडे पडल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या भीषण परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (२३ सप्टेंबर) करजखेडा येथील शंभर टक्के कोरड्या पडलेल्या मसाई तलावाची पाहणी करून प्रत्यक्ष दखल घेतली. शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी येत्या दोन दिवसांत शासन निर्णय काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यास दुष्काळी परिस्थिती गृहीत धरली जाते. मात्र, धाराशिवमध्ये अनेक भागांत पावसाचा अक्षरशः अभाव आहे. त्यामुळे येथील दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून आगामी रब्बी हंगामही संकटात सापडला आहे.
उपलब्ध जलस्रोतांमधून पिकांसाठी होणारा पाणीउपसा बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. खरीप पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे उरलेले पाणी पिकांसाठी वापरण्याऐवजी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याला प्राधान्य द्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाने शेतकरी अडचणीत असताना थकीत पीककर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी नोटिसा पाठवून आगाऊपणा केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. पीककर्जमाफी आणि वीजबिलमाफी योजना सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पिकांची पाहणी करताना दुष्काळाचे भीषण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले. सोयाबीनसह खरीप पिकांना शेंगा लागल्या असल्या तरी त्यामध्ये दाणे भरलेले नाहीत. काही ठिकाणी दाणे भरले असले तरी ते अत्यंत बारीक आहेत. पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांवर झालेल्या परिणामाचे हे प्रत्यक्ष चित्र असल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले.
मुख्यमंत्री लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर धाराशिवमध्ये दाखल झाले. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार बसवराज पाटील, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.