उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
हे प्रकरण 2009 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात वसंत डावखरे आणि आनंद परांजपे यांच्यात निवडणूक लढत झाली होती. 22 एप्रिल 2009 रोजी परांजपे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डावखरे यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेला एक व्हिडिओ/CD सार्वजनिकरीत्या दाखवला होता.
त्या व्हिडिओतील वक्तव्य आपले नसल्याचा दावा वसंत डावखरे यांनी केला होता. तसेच व्हिडिओ निवडक पद्धतीने एडिट करून आपली बदनामी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात मानहानीचे प्रकरण न्यायालयात पोहोचले.
जवळपास 17 वर्षे चाललेल्या या प्रकरणात 20 हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्यात आले होते. आरोपींकडून आरोप फेटाळण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 23 सप्टेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
हे प्रकरण 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानचे आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात शिवसेनेची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वसंत डावखरे, तर शिवसेनेकडून आनंद परांजपे निवडणुकीच्या मैदानात होते. 22 एप्रिल 2009 रोजी झालेल्या प्रचारसभेत डावखरे यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेला एक व्हिडिओ/CD दाखवण्यात आला होता.
या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्यास सांगत असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, डावखरे यांनी व्हिडिओतील वक्तव्य नाकारले होते. व्हिडिओ निवडक पद्धतीने एडिट करून बदनामीसाठी वापरल्याचा त्यांचा आरोप होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.
अंतिम निकालात न्यायालयाने उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर या चौघांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे 2009 च्या निवडणुकीपासून सुरू असलेल्या या दीर्घकाळ चाललेल्या प्रकरणावर न्यायालयीन स्तरावर पडदा पडला आहे.
निकालानंतर आनंद परांजपे यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या 17 वर्षांपासून ही केस सुरू होती आणि आता न्याय मिळाल्याचे त्यांनी म्हटले. तसेच वसंत डावखरे हे तेव्हाही आपल्यासाठी आदरणीय होते आणि आजही आदरणीय आहेत, अशी प्रतिक्रिया परांजपे यांनी दिली.






