
महिला उद्योजकतेला बळ! प्रत्येक कर्जप्रकरणासाठी सीआरपींना ₹१ हजार; धाराशिवचा राज्यात पहिला प्रयोग
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : प्रत्येक गावातील किमान चार ते पाच महिलांना उद्योजक बनवून जिल्ह्यात सुमारे ३५०० महिला उद्योजक घडविण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उमेद अभियानातील समुदाय संसाधन व्यक्तींना (सीआरपी) प्रत्येक कर्जप्रकरणामागे एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. अशा प्रकारची योजना राबविणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ३८४ स्वयंसहाय्यता गट स्थापन झाले असून, त्यात १ लाख ४६ हजार ११९ महिला सदस्य सहभागी आहेत. या माध्यमातून ७७८ ग्रामसंघ, ५५ प्रभागसंघ, ५१४ उत्पादक गट आणि महिलांच्या ९ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
स्वयंसहाय्यता गटातील महिलांना केवळ बचत गटाच्या चौकटीत न ठेवता त्यांना सक्षम उद्योजक बनविण्यासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात सुमारे १२०० समुदाय संसाधन व्यक्ती कार्यरत असून, गटांची स्थापना, बचतीची सवय, कर्ज मिळवून देणे आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मदत करण्याची जबाबदारी त्या पार पाडत आहेत. या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात सध्या सुमारे १ लाख १९ हजार महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. आता त्यापुढे ‘करोडपती दीदी’ घडविण्याचा अभियानाचा मानस असल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले.
धाराशिव जिल्ह्यात एकूण ७३४ गावे असून, प्रत्येक गावातून किमान चार ते पाच महिला उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) या योजनांच्या माध्यमातून महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कर्जप्रकरणांची पूर्तता करण्यासाठी उमेदच्या सीआरपींना प्रोत्साहन देण्यात येणार असून, प्रत्येक मंजूर कर्जप्रकरणासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने १ हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे सीआरपींचे मनोबल वाढण्यासोबतच महिलांना उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन आणि मदत मिळण्यास गती मिळणार आहे.
धाराशिव जिल्ह्याने मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमात (CMEGP) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात ७०० पेक्षा अधिक उद्योगांना कर्जवाटप झाले आहे. मागील सलग तीन वर्षे CMEGP योजनेत धाराशिव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. ही आघाडी कायम ठेवण्यासाठी महिला उद्योजक निर्मितीचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.