
दुष्काळाचा आणखी एक बळी! 34 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात
राठोड हे बंजारा समाजातील अल्पभूधारक शेतकरी होते. शेतीबरोबरच ते ऊसतोड कामगार म्हणूनही काम करीत होते. यंदाच्या अनियमित पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले, तर मागील वर्षीच्या अतिवृष्टीनेही शेतीचे नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने उत्पन्नाचा आधारच ढासळला. त्यात ऊसतोडीच्या पैशांशी संबंधित देणी तसेच मित्रपरिवाराकडून घेतलेल्या कर्जाचा बोजा वाढत गेला. शेतीतून उत्पन्न नाही आणि कर्जाचा डोंगर वाढतच चालला, अशा दुहेरी संकटाने राठोड यांना घेरले होते.
अकोल्यात कुटुंब नियोजनात महिलाच आघाडीवर; 2431 महिलांनी केली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
गुरुवारी शेतातील पिकांची दुरवस्था पाहिल्यानंतर रात्री राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन जीवन संपविले, अशी माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, १२ वर्षांचा मुलगा आणि १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार हरपल्याने दोन मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्रही हिरावले गेले.
शुक्रवारी सकाळी नातेवाईक, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी दयानंद राठोड यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आणून ठिय्या आंदोलन सुरू केले. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील सुशिक्षित सदस्याला शासकीय नोकरी द्यावी आणि आत्महत्येचा तातडीने पंचनामा करून शासनाकडे अहवाल सादर करावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या.
‘मदत मिळालीच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन धाराशिव शहर पोलीस ठाणे तसेच आनंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दुष्काळ आणि नापिकीने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत असताना आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाकडून मागण्यांबाबत लेखी अहवाल आणि ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईक व शेतकऱ्यांनी घेतला. राठोड यांच्या आत्महत्येने धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ, नापिकी, वाढते कर्ज आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर असून शासनाचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी केवळ पाहणी करण्यात आणि पंचनामे करण्यात मश्गुल आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे हात कोरडेच आहेत. त्यामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याची नामुष्की शेतकऱ्यावर येत आहे. आणखी किती शेतकऱ्यांचे बळी शेतकऱ्यांना हवे आहेत? मग शासन मदत करेल? असा उद्विग्न आणि संतप्त सवाल उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे.