
रब्बी पीककपाहणीत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : रब्बी हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची नोंदणी त्वरित करावी यासाठी महसूल प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि थेट मार्गदर्शन करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधला आहे.
२४ जानेवारीपूर्वी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपली ईपीकपाहणी नक्की करून घ्यावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ सुनिश्चित करावा. २४ जानेवारी ते १० मार्चपर्यंत सहायक स्तरावर पीकपाहणी करता येईल. यासाठी संबंधित सहायकाची माहिती व संपर्क क्रमांक त्या गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून उपलब्ध होतील, असे आवाहन करत निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी कळविले आहे.
राज्य शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हेअंतर्गत रब्बी हंगामाची पीकपाहणी सुरू आहे. ही पाहणी स्वतः शेतकऱ्यांनी मोबाईल ऍपद्वारे किंवा मदत केंद्राच्या माध्यमातून करावयाची असून याचा थेट लाभ शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांत मिळणार आहे. ईपीकपाहणी नोंदी आधारे पीकविमा, नुकसानभरपाई, आपत्तीसहाय्य, अनुदान, कर्ज सुविधा व इतर कृषी योजनांचा लाभ निश्चित केला जातो. यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची पीकपाहणी अचूक व वेळेत करणे आवश्यक आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार २४ जानेवारीपर्यंत शेतकरी स्तरावर जास्तीत जास्त ईपीकपाहणी करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मोबाईल वरील अधिकृत ईपीकपाहणी ऍपद्वारे स्वतः पीकपाहणी नोंदवावी. अडचण आल्यास ग्राम महसूल अधिकारी, शेतकरी मित्र, कृषी सहायक, पोलीस पाटील किंवा महसूल सेवक यांची मदत घ्यावी. आपल्या शेतातील प्रत्यक्ष पिकाचीच अचूक नोंद करावी. कायमपडीत, पोटखराब, किंवा लागवड नसलेल्या जमिनीची योग्य नोंद करणे आवश्यक आहे.
यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे गावोगावी विशेष मोहीम राबविली जात आहे. दररोज कामाचा आढावा घेतला जात आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून भविष्यातील सर्व शासकीय लाभ ईपीकपाहणीच्या नोंदीवर आधारित असणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येआले आहे.