
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! सरनाईक कुटुंबाकडून दोन लाख 'आनंदाचा शिधा' किट वाटपाचा उपक्रम
या किटमध्ये साखर, रवा, मैदा, तूप आणि बेसन यांसारख्या दिवाळीच्या फराळासाठी आवश्यक वस्तूंचा समावेश असणार आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना सणासुदीच्या काळात आधार मिळावा आणि त्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून यापूर्वीही धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना १०० दुभत्या गायींचे वाटप करण्यात आले होते. आता दिवाळीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणे, ही शिवसेनेची भावना आहे. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आम्ही पुढे घेऊन जात आहोत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, हेच आमचे कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची आगाऊ आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ ऑक्टोबर रोजी याबाबत माहिती दिली. केंद्राच्या मदतीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी राज्याच्या निधीतून ही मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारी मदतीबरोबरच सामाजिक स्तरावरूनही शेतकऱ्यांना आधार देण्याचे प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत. सरनाईक कुटुंबाचा ‘आनंदाचा शिधा’ उपक्रम याच पार्श्वभूमीवर राबविण्याचे नियोजन आहे.
Amravati News: अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका! गहू-हरभरा पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसमोर संकट