मे महिन्यात Tulja Bhavani Temple विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
यासंदर्भात मंत्रालयात गुरुवार, ९ एप्रिल रोजी आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आमदार राणाजगजीतसिंह पाटील, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले की, राज्य शासनाने सुमारे १८६५ कोटी रुपयांच्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ४२१ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. विकास कामांमुळे बाधित होणाऱ्या १०५ खाजगी मालमत्तांपैकी सुमारे ७५ टक्के मालमत्ताधारकांशी यशस्वी वाटाघाटी पूर्ण झाल्या असून उर्वरित प्रक्रियाही लवकर पूर्ण केली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर, विविध विकास कामांचे भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर तुळजाभवानी मंदिर परिसराचा भव्य आणि दिव्य विकास करण्यासाठी नियोजनबद्ध कामे करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत रामदरा तलाव परिसरात शिवसृष्टी उद्यान उभारणी, मंदिर परिसरातील आठ प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, तसेच आठ कुंडांचे पुनरुज्जीवन यावर चर्चा झाली. याशिवाय पार्किंग प्लाझा, प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण, भक्तनिवास व दर्शन मंडप उभारणीसंदर्भातही सूचना देण्यात आल्या. तुळजापूर शहराचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता, शहरासाठी स्वतंत्र मास्टर प्लॅन तयार करून सुनियोजित विकास साधण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांविषयी समाजात असलेला आदर लक्षात घेता त्यांच्या स्मारकांची उभारणी नियमानुसार व्हावी, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले. काही ठिकाणी अनधिकृत पुतळे उभारले जात असल्याने सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यासाठी जिल्हा प्रशासनाने समिती स्थापन करून इच्छुकांना शासनाच्या निकषांनुसार मार्गदर्शन करावे, असे निर्देश देण्यात आले. यामुळे सामाजिक सलोखा अबाधित राहण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासोबतच मुख्यमंत्री शेतकरी सौर पंप योजना, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, जलसंपदा, मृद व जलसंधारण, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना तसेच जलजीवन मिशनअंतर्गत पाणीटंचाई या विषयांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.






