कल्याण: मानपाडा पोलीस ठाण्याची (Manpada Police Station) निर्मिती १९७० मध्ये झाली. पोलीस ठाण्याची हद्द तब्बल ६८ चौ.कि.मी.इतकी आहे. हे परिमंडळ ३ मधील सर्वात मोठे पोलीस ठाणे आहे. त्यामुळे त्याचे विभाजन करावे, अशी मागणी वारंवार केली जात आहे. दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्द विभाजनाची प्रतीक्षा संपुष्टात येण्याचे संकेत मिळत असून काटई (Katai) हे नवीन पोलीस स्टेशन लवकरच होण्याची दाट शक्यता आहे.
[read_also content=”आज पुन्हा समृद्धी महामार्गावर वाशिम येथील कारंजाजवळ अपघातच; दोन ठार, दोन गंभीर https://www.navarashtra.com/maharashtra/another-accident-today-near-the-fountain-at-washim-on-the-samriddhi-highway-two-killed-two-seriously-nrrd-357508.html”]
काटई पोलीस ठाणे झाले की मानपाडा पोलीस ठाण्यावरचा ताण कमी होईल असे परिमंडळ ३ चे डीसीपी सचिन गुंजाळ (Sachin Gunjal) यांनी सांगितले. मानपाडा पोलीस ठाण्याची हद्दीमध्ये ग्रामीण आणि शहरी भाग आहे. या हद्दीत मोठ्या गृहसंकुलांची उभारणी झाली आहे आणि अजून सुद्धा केली जात आहे. त्यामुळे या परिसरात नागरीकरण, कंपन्या, बार-रेस्टॉरंटचे जाळे, कामानिमित्त परराज्यातून येणाऱ्या नागरिकांचे वास्तव्य वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या पोलीस कर्मचारी वर्गामुळे कायदा सुव्यवस्था राखणे जिकिरीचे झाले आहे. एखादी गुन्ह्याची मोठी घटना घडली की, हद्दीच्या विभाजनाचा मुद्दा नेहमीच चर्चिला जातो. सप्टेंबर २०२१ मधील बहुचर्चित सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या वेळी स्थानिक सामाजिक संघटना, आजी-माजी लोकप्रतिनिधी या पोलीस स्टेशनचा विभाजनाचा मुद्दा उचलून धरला होता. अखेर या पोलिस ठाण्याच्या हद्द विभाजनाची प्रतीक्षा संपुष्टात येण्याचे संकेत मिळत असून काटई हे नवीन पोलीस स्टेशन लवकरच होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्यावरचा ताण कमी होणार आहे.