'कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका...'; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भरला दम
Ajit Pawar News: ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात, चूक होऊ देऊ नका. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका.’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पादधिकाऱ्यांना दम भरला आहे. ते पु्ण्यात बोलत होते. गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारमधील काही मंत्री आणि नेते त्यांच्या बेताल आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे विरोधकांनी राज्य सरकारलाही चांगलेच धारेवर धरलं आहे. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहे.
पुण्यात पीडीसीसी बँकेच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांची कान उघडणी केली आहे. ‘तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात. त्यामुळे आपल्याकडून कधी, कुठे, काही चूक होऊन देऊ नका. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका. कुठे जाऊन ठौय ठौय करू नका.’ असा सल्लाही अजित पवार यांनी दिला. दरम्यान, दौंडमधील चौफुला येथे झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे. शंकर मांडेकर यांच्या भावावर चौफुला गोळीबाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आमदार शंकर मांडेकरांसमोरच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे.
कारण प्रत्येक शब्दाचं शूटिंग चालू असतं” – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ” उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी नीट वागणं आणि बोलणं आवश्यक झालं आहे. माझा प्रत्येक शब्द शूट केला जातो. पूर्वी म्हणता यायचं की, ‘मी असं बोललो नाही’, कारण कुठलाही पुरावा नसायचा. तो काळ गेला… ३५ वर्षांपूर्वीचा. आता लगेच दाखवतात – ‘बघा काय बोललात ते’. आणि ते एकदाच नाही, तेच तेच पुन्हा पुन्हा दाखवत राहतात. लोक विचारतात, ‘हा किती वेळा असं बोलतोय?’ आणि मी म्हणतो, ‘मी असं बोललोच नाही’. हे नवीन तंत्रज्ञान सुरू आहे. त्यामुळे तारतम्य ठेवून बोलणं गरजेचं झालंय.”
तसेच त्यांनी चंद्रकांत पाटलांचाही नामोल्लेख करत सांगितले, “मघाशी चंद्रकांत कोणावर तरी खेकसला. अरे चंद्रकांत, तू माझ्यावर जाऊ नकोस. लोकांनी मला मान्यता दिली आहे. लोक म्हणतात, ‘हा बोलतो म्हणजे काम होणारच.’ माझ्यावर विश्वास ठेवला जातो. त्यामुळे जबाबदारी वाढल्यापासून मी अधिक जबाबदारीने, सकारात्मक बोलायचा प्रयत्न करतो. आज मी सगळ्यांना फोटो काढू दिले. शेवटी मला तुमची, आणि तुम्हाला माझी गरज आहे. आपण एक कुटुंब झालोय. एकमेकांचा द्वेष करायला आपण एकत्र आलेलो नाही,” अशा शब्दांत अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची कानउघडणी केली.
Eknath Shinde: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; तेजस ठाकरेंचा शिवसेनेत प्रवेश
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. काही जणांनी आपल्या सुनांना कशाप्रकारे त्रास दिला, पण ते आम्ही सांगितलं होतं का, त्यांनी लग्नाला बोलावलं आणि आम्ही गेलो. उद्या सरपंचाने जरी आम्हाला लग्नाला बोलावलं तरी आम्ही जाणार, पण पुढे जाऊन ते काय दिवे लावणार, हे माहिती असतं तर आम्ही नाही जाणार. किमान माणुसकी तरी लक्षात ठेवा ना बाबांनो, जातीचा पातीचा, नात्याचा गोत्याचा विचार न करता, जातीय सलोखा ठेवा, शिव शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा आहे,” हे लक्षात ठेवा, असंही त्यांनी सांगितलं.