इचलकरंजीत अपघात (फोटो- टीम नवराष्ट्र)
इचलकरंजी: इचलकरंजीमध्ये समोर निघालेल्या दुचाकीला डंपरने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. राजेंद्र शिवाजी चोपडे (वय ५८ रा. तारदाळ रोड खोतवाडी) असे त्यांचे नांव आहे. सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात ही घटना घडली. अपघातानंतर डंपर चालकाने पलायन केले. तर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करुन त्याची तोडफोड केली. या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात दावलमलिक अल्लाबक्ष छपरबंद (वय ३१ रा. शामरावनगर जयसिंगपूर, मुळ रा. येनकैंची ता. सिंदगी जि. विजापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघाताची तक्रार प्रविण राजेंद्र चोपडे (वय ३३) याने दिली आहे.
खोतवाडी येथील राजेंद्र चोपडे हे शनिवारी सकाळी कामानिमित्त दुचाकी (क्र.एमएच ०९ डीएच ५२२०) वरुन इचलकरंजीत आले होते. काम आटोपल्यानंतर ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरी परतत होते. सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येत असलेल्या डंपर (क्र. एमएच २० एटी ८५९३) ने जोराची धडक दिली.
डंपरच्या धडकेने चोपडे हे दुचाकीसह रस्त्यावर पडले. त्याचवेळी डंपर त्यांच्या अंगावरुन गेल्याने चोपडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर नागरिकांचा आरडाओरडा ऐकून डंपर चालकाने थोड्या अंतरावर जात डंपर थांबवला व त्याने घटनास्थळावरुन पलायन केले. अपघाताची माहिती समजल्यानंतर अपघातस्थळी चोपडे यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार जमले होते.
Pune Accident: दारू पिऊन १२ जणांना उडवले; पुण्यातील घटनेबाबत CM फडणवीसांचे ‘हे’ महत्वाचे निर्देश
या अपघातामुळे संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करुन त्याची तोडफोड केली. अपघाताची माहिती समजताच गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन विच्छेदनासाठी मृतदेह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यात भीषण अपघात
काल पुण्यात संध्याकाळच्या सुमारास सदाशिव पेठेत एक भीषण अपघात घडला. एक मद्यधुंद कार चालकाने १२ विद्यार्थ्यांना गाडीने उडवल्याची दुर्दैवी घटना घडली. पुण्याच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडली आहे. सदाशिव पेठ हा कायमच वर्दळ असणारा भाग आहे. या ठिकाणचे रस्ते अरुंद आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. जखमीनवर उपचार सुरू आहेत.
पुणे शहरातील सदाशिव पेठेत असणाऱ्या भावे हायस्कूल जवळ एका कार चालकाने चहा पित असणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना धडक दिली. यात 2 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. य घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.