पुणे : खेलो इंडिया संपूर्ण भारतामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याच धर्तीवर खेलो महाराष्ट्र ही स्पर्धा भरविण्यासाठी प्रयत्न केले जातील, त्यासाठी क्रीडाप्रेमी, संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
सिद्धिविनायक मित्र मंडळ , बाणेर यांच्या वतीने आयोजित बाणेर येथील कै.सोपानराव बाबुराव कटके मनपा शाळेच्या मैदानावर पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
“कबड्डी क्षेत्राला व खेळाडूंना कोणतीही कमतरता भासू देणार नाही. येत्या काळात अजून या क्षेत्रात नाविन्य आणण्याचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून निश्चितपणे यासाठी प्रयत्न करणार आहोत “असे ही तटकरे यांनी नमूद केले. खेलो महाराष्ट्र सारख्या स्पर्धा आयोजित करण्यात येतील यामुळे महाराष्ट्रातील तळागाळातील गोरगरीब खेळाडूंना आपला खेळ दाखविण्याची संधी प्राप्त होईल असेही ते म्हणाले.यावेळी या स्पर्धेचे आयोजक किरण चांदेरे, अमोल भोरे, सिद्धाराम कलशेट्टी, राकेश सायकर, अमित धनकुडे, हरिष सुकनाळे, राजेश चौकीमठ यांचे तटकरे यांनी कौतुक केले .
याप्रसंगी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बाबुराव चांदेरे यांचे कौतुक केले.”ज्याप्रमाणे बाणेर-बालेवाडी या परिसराचा नियोजन बद्ध विकास केला त्याच प्रमाणे कबड्डी क्षेत्रात ही चांदेरे यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन करीत आहे”असे आढळराव पाटील म्हणाले.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी ” पुणे जिल्ह्यातील किशोर गटातील शेकडो खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सिध्दीविनायक मित्र मंडळाने स्पर्धा आयोजित केली. किशोर गटातील खेळाडूंना पोषक वातावरण तयार करून दिले तरच हे खेळाडू भविष्यात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करतील.त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार,सुनील तटकरे यांच्यासह कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कायम प्रयत्नशील राहतील.” असा विश्वास व्यक्त केला.
समीर चांदेरे याची नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाणेर-बालेवाडी-सुस आणि म्हाळुंगे मधील ग्रामस्थांच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नागरी सत्कार देखील करण्यात आला. या स्पर्धेकरिता पुणे जिल्ह्यातून खुले गटाकरिता पुरुष विभागातून ५१ संघ आले आणि १६ महिलांचे संघ आले असे खुले गटा करिता एकूण ८०४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला तर किशोर गटाकरिता एकूण ३७ मुलांचे संघ आले तर १४ मुलींचे संघ यांनी सहभाग नोंदविला असे किशोर गटाकरिता एकूण ६१२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला एकूण १४१६ खेळाडूंनी आपला सहभाग या स्पर्धे करिता नोंदविला आहे .
यावेळी अर्जुनवीर शांताराम जाधव, अर्जुनवीर शकुंतला खटावकर यांच्यासह असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार दिनकर पाटील, खजिनदार मंगल पांडे, सह सचिव मोहन गायकवाड यांच्यासह पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षा संगीता कोकाटे, मोहिनी जोग(चाफेकर), वासंती बोर्डे(सातव), दत्तात्रय कळमकर, राजेंद्र काळोखे, दत्तात्रय झिंजुर्डे, प्रकाश पवार, कविता आल्हाट, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, अर्जुनवीर पुरस्कार विजेत्या व नवीसांगवी जिल्हा क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे, पूनम विशाल विधाते, राहुल बालवडकर, डॉ.सागर बालवडकर, मनोज बालवडकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, पुणे जिल्हा शिवसेना जिल्हा समन्वयक रवींद्र करंजखेले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे साहेब, सचिन भोसले, यांच्यासह पदाधिकारी, पंच आदि उपस्थित होते.