कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु
कोरोना काळात ठाणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत महत्त्वाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली असून आयुक्तांचा या विषयावर सकारात्मक प्रतिसाद असल्याची माहिती समोर आली आहे.
या मागणीचे निवेदन घेऊन शिवसेनेचे शिष्टमंडळ माजी महापौर अशोक वैती यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आयुक्त राव यांना भेटले. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्तीचा ‘बाप्पा पावणार’ अशी आशा निर्माण झाली आहे.
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य, स्वच्छता, आपत्कालीन सेवा आदी विभागांमध्ये योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांनी १४ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी प्रामुख्याने सेवेत कायम करण्याची मागणी मांडली. या मागणीची दखल घेत शिंदे यांनी तत्काळ पालिका आयुक्तांशी संवाद साधला आणि यासंदर्भात लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
माजी महापौर वैती यांनी सांगितले की, गणेशोत्सवाआधी या संदर्भात एक विशेष बैठक होणार असून त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वयमर्यादा, कामाचा अनुभव आणि नियुक्ती प्रक्रियेतील अडचणी यावर सविस्तर चर्चा केली जाईल. या बैठकीत कर्मचारी प्रतिनिधींसोबतच वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी शिष्टमंडळात उपनेत्या अनिता बिर्जे, माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, प्रियंका सांगरे आणि करोना काळातील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्यासाठी सर्वांनी सकारात्मक मत व्यक्त केले.
जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?
सध्या ठाणे महापालिकेची भरती प्रक्रिया सुरु असून या प्रक्रियेत करोना काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यांच्या मेहनतीचा व अनुभवाचा योग्य सन्मान करून कायम नियुक्ती देण्यात यावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. प्रशासन आणि जनप्रतिनिधींकडून यावर सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता व आनंदाचे वातावरण आहे.
एकूणच, करोना काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या त्यागाची दखल घेऊन त्यांना ठाणे महापालिकेत कायम करण्याची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे.