मुंबई : रविवारी (२ जुलै 2023) रोजी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. जे विरोधक होते तेच येऊन सत्तेत बसले. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत. त्यामुळं ज्या जनतेनी मतदान केलं होतं, ते मतदान फुकट गेल्याची संतापाची लाट जनसामान्यातून येत आहे. मतदान केलं कोणाला आणि तो जातो कुठे? ही भावना सध्या राज्यात आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात राजकारण्याविषयी प्रचंड चीड आहे.
‘एक सही संतापाची’ अभियान…
दरम्यान, आज नवी मुंबईतील वाशी येथे ‘एक सही संतापाची’ अभियान राबविण्यात आले. याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या २.५ वर्षात जे पक्ष, आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे, त्याने महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला आहे. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले, त्याच महाराष्ट्राची ही झालेली अवस्था पाहून मराठी माणसामध्ये राजकारणाबद्दल चीड निर्माण झाली आहे. याच रोषाला वाचा फोडण्यासाठी राज ठाकरेंनी ‘एक सही संतापाची’ हा उपक्रम राबवण्यास सर्व मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांना सांगितल आहे. त्यानुसार नवी मुंबई मनसेतर्फे आज एक सही संतापाची हा उपक्रम वाशी स्थानकाबाहेर सकाळी घेण्यात आला.
लोकांमध्ये संतापाची लाट
या उपक्रमाअंतर्गत हजारो नागरिकांनी आपली सही बॅनरवर करून आपला राग व्यक्त केला. मनसे प्रवक्ते, नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत अनेक नागरिकांनी संतापाची सही करण्याबरोबरच सरकारबद्दल राग व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण यांनी उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभाग घेवून या घाणेरड्या राजकारण्यांवर आपला राग व्यक्त केला. मनसे हा एकमेव राजकीय पक्ष आहे जो या चिखलाने बरबटलेला नाही, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांनी दिली.
तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी एवढी ढासळलेली असताना राज ठाकरे यांच्या हातात आता महाराष्ट्राची सत्ता दिली पाहिजे. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया सुद्धा सामान्य नागरिकांनी दिली. मनसेच्या या उपक्रमात शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, विनोद पार्टे , शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, सह सचिव अभिजित देसाई, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.