(Photo - X)
नवी दिल्ली: सीमेवर देशाच्या रक्षणासाठी जवान रक्त सांडत असताना, महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी रक्तदानातून उभा राहिला आहे. जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी सेवाभावातून राष्ट्रभक्ती कृतीत उतरविण्याचा संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. क्रांतिदिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित ‘सिंदूर महारक्तदान व यात्रा शिबिरा’त बोलताना शिंदे यांनी रक्तदात्यांचे कौतुक करत देशरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांना कृतज्ञतापूर्वक सलाम केला.
“सीमेवर बंदूक घेऊन अहोरात्र जागणाऱ्या जवानांमुळे आपण आपल्या घरात शांतपणे झोपू शकतो. त्यांच्या सन्मानासाठी रक्तदान करणे ही छोटी गोष्ट नाही; ही देशसेवेची भावना आहे,” असे शिंदे यांनी सांगितले. ‘सिंदूर महारक्तदान’ उपक्रमाचा हेतू केवळ रक्तसंकलन नसून, देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या त्यागाची समाजाला जाणीव करून देणे हा आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले शिवसैनिक, कार्यकर्ते, पैलवान आणि रक्तदाते या उपक्रमात सहभागी झाले. “रक्तदान ही छोटी गोष्ट नाही. एखाद्याचा जीव वाचवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. जवानांच्या सन्मानासाठी महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी नमूद केले.
देशहित आणि राष्ट्रसेवा ही कोणत्याही राजकीय चौकटीपेक्षा मोठी असल्याचे अधोरेखित करत शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राष्ट्रनिष्ठ परंपरेचा उल्लेख केला. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा दिला. त्याच परंपरेतून आज महाराष्ट्रातील नागरिक सीमावीरांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे शिंदे म्हणाले.
देशाच्या सुरक्षेचा संदर्भ देताना शिंदे यांनी एप्रिल २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तराचा उल्लेख केला.
दहशतवाद्यांनी देशाला आव्हान दिल्यानंतर भारतीय जवानांनी शौर्य आणि धैर्याने त्याला योग्य प्रत्युत्तर दिले. “भारत कोणालाही छेडत नाही; मात्र भारताला कोणी छेडले तर सोडतही नाही,” असा स्पष्ट संदेश भारताच्या सामर्थ्याची ओळख असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती भारताने जगासमोर सिद्ध केली असून, जवानांच्या शौर्यामुळे देशाचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातून शिंदे यांनी भारताच्या वाढत्या संरक्षण सामर्थ्याचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र निर्मिती आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला मिळणारी चालना भारताचे संरक्षण कवच अधिक मजबूत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
“ज्या ठिकाणी तिरंगा फडकवण्याची हिंमत केली जात नव्हती, त्या ठिकाणी आज तिरंगा अभिमानाने फडकवला जात आहे,” असे सांगत शिंदे यांनी भारताच्या बदलत्या सामर्थ्याचा उल्लेख केला.
या उपक्रमाला महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रानेही उत्स्फूर्त साथ दिली. महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान आणि कार्यकर्त्यांनी रक्तदानात सहभाग घेतला.
आखाड्यात पराक्रम गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या पैलवानांनी जवानांच्या सन्मानासाठी रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल शिंदे यांनी चंद्रहार पाटील यांचे विशेष अभिनंदन केले.“महाराष्ट्रातील पैलवान आणि रक्तदाते यांनी देशसेवेची भावना कृतीत उतरवली आहे. हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे,” असे शिंदे म्हणाले.
‘सिंदूर महारक्तदान’च्या माध्यमातून रक्तदान, सैनिकांचा सन्मान आणि राष्ट्रभक्ती या तीन भावनांना एकत्र आणत महाराष्ट्राने देशाच्या राजधानीत जवानांप्रती असलेल्या कृतज्ञतेचा संदेश दिला.
‘पवारांचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार?’; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, डीलिमिटेशनवरही सवाल
यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेना संसदीय पक्षाचे नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, व्हाइस अॅडमिरल आरती सरीन, लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग, लेफ्टनंट जनरल नीरज सेठी, लेफ्टनंट जनरल अविनाश दास, राज्यसभा सदस्य डॉ. ज्योती वाघमारे, महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह लष्करी अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी शिंदे यांनी भारतीय जवानांना कृतज्ञतापूर्वक सलाम केला. “भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिंद आणि जय महाराष्ट्र” अशा घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.
सीमेवर जवान देशासाठी रक्त सांडतो; देशाच्या अंतर्गत भागातून त्याच्यासाठी रक्तदानाची साथ उभी राहते. ‘सिंदूर महारक्तदान’च्या माध्यमातून महाराष्ट्राने या कृतज्ञतेला कृतीची जोड दिली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवानांच्या सन्मानाचा हा राष्ट्रभक्तीचा संदेश दिल्लीच्या व्यासपीठावरून देशापर्यंत पोहोचवल्याचे बोलले जाते.






