कुडाळ तालुका तसेच माणगाव पंचक्रोशीत विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा महावितरणकडे वीज समस्या दूर कराव्यात, अशा मागण्या केल्या. मात्र, माणगाव पंचक्रोशीतील माणगाव, वसोली, उपवडे, आंजिवडे, शिवापूर, आकेरी, झाराप तसेच कुडाळ तालुक्यातील नेरुर, गोवेरी, मांडकुली, घावनळे येथील वीज समस्या सोडविण्यास महावितरण टाळटाळ करीत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. रात्रीच्या वेळ वीजप्रवाह अचानक खंडित होणे, वीजतंत्री (वायरमन) नसणे, डीपी सुस्थितीत नसणे, आवश्यक त्या ठिकाणी वीज नसणे, महावितरणकडून सकारात्मक उत्तरे न मिळणे आदी समस्या नागरिकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत महावितरणकडे मांडल्या.
याबाबत आमदार वैभव नाईक यांनी महावितरणच्या कामात होणारी टाळाटाळ, दुर्लक्षपणा याबाबत अधिकारी वर्गाला धारेवर धरले. तसेच गोवेरी येथे एक वर्षापूर्वी कायमस्वरूपी वायरमन देण्याबाबत महावितरण अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिलेली हमी याबाबत आमदार वैभव नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी विनोद पाटील यांनी गोवेरी येथे लवकरात लवकर मार्गी हे कायमस्वरूपी वायरमन देण्यात येतील असे आश्वासन दिले.
माणगाव पंचक्रोशीतील वीज समस्या सोडविणार
आमदार वैभव नाईक तसेच माणगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी वीज समस्या दूर करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. रात्री-मध्यरात्री खंडित होणारी वीज, महावितरणकडे असलेल्या अपुरे कामगारांची संख्या, महावितरणच्या कर्मचारी वर्गाकडून मिळणारी उलट सुलट उत्तरे आदी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.
याबाबत महावितरण अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांनी पावसाळ्यातील संभाव्य वीज समस्या टाळण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. या भेटीदरम्यान माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, बबन बोभाटे, अतुल बंगे, योगेश धुरी, सचिन काळप, संतोष शिरसाट, मांडकुली सरपंच तुषार सामंत, वसोली सरपंच अजित परब, आकेरी सरपंच तसेच माणगाव पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.