माजलगाव : दोन-तीन वर्षांपासूनच्या समाधानकारक पावसामुळे यंदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अतिरिक्त उसाचे संकट घोंगावत आहे. वर्षी मराठवाड्यात मे अखेर तब्बल ६० लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक राहणार असल्याचा अंदाज औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीतील विभागीय आयुक्तांच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान यातील ९० टक्के अतिरिक्त ऊस बीड, जालना, लातूर जिल्ह्यात आहे. याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिल्या आहेत.
मागील दोन-तीन वर्षांपासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे मराठवाड्यातील धरणांसह पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरत असून भूगर्भातील पाणीपातळी वाढली आहे. यामुळे नगदी पीक असलेल्या उसाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांनी भर दिला. बहुतांशी शेतकऱ्यांनी ऊस लागवड केल्याने यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी २९ मार्चला औरंगाबाद येथे मराठवाड्यातील साखर कारखान्याचे व्यवस्थापक, प्रदेश सह साखर संचालक, जिल्हाधिकारी यांच्यात बैठक झाली.
या बैठकीत कारखान्यांच्या व्यवस्थापकांनी २४ मार्चपर्यंत एकूण नोंद असलेला ऊस, गाळप केलेला ऊस, मे अखेर गाळप करण्यात येणार ऊस आणि मे अखेर शिल्लक राहणार ऊस याची आकडेवारी सादर केली.
[read_also content=”भारताने पार केलं गहू निर्यातीचं लक्ष्य; विक्रमी तब्बल ‘इतक्या’ टनांची निर्यात https://www.navarashtra.com/india/india-surpasses-wheat-export-target-exports-of-so-many-tons-nrdm-264879.html”]
अतिरिक्त ऊस गाळपासाठी शासनस्तरावर काही प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. याचा आढावा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतला असता कारखाना व्यवस्थापकाच्या आकडेवारीवरून मराठवाड्यात तब्बल ६० लाख ७३ हजार २१४ मेट्रिक टन ऊस अतिरिक्त राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे अतिरिक्त ऊस गाळपाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिल्या आहेत.