सौजन्य - नवराष्ट्र टीम
साधारणपणे डिसेंबरच्या मध्याला ऊसाला तुरे यायला सुरुवात होते, मात्र यंदा पिकांच्या वाढीच्या प्रारंभिक टप्प्यातच तुरे दिसू लागले आहेत. तुरे आल्याने ऊस जाडीस येणे थांबते आणि सरासरी प्रति एकरी ४ ते ५ टनांपर्यंत वजन घट होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तुऱ्यांमुळे वजनात होणारी घट टाळण्यासाठी कारखान्यांनी त्वरीत ऊसतोड हंगाम गतिमान करण्याची मागणी होत आहे. कारखाने वेळेत तोड करू शकले नाहीत तर शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या तोडणी कर्मचाऱ्यांना तातडीने फेरपाहणी करण्याची मागणी केली आहे.
उत्पादनात घट, वैरणीचा प्रश्न गंभीर
तुरा फुटलेल्या उसाचा जनावरांना खाद्य (वैरणी) म्हणून उपयोग होत नसल्याने दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ऊस उत्पादन घटलेच तर गाई-म्हशींसाठी लागणाऱ्या वैरणीचा तुटवडा वाढणार आहे. यामुळे पशुपालक शेतकरी देखील चिंतातूर आहेत.
खोडव्याच्या उसालाही तुरा
खोडव्याचा ऊस साधारणपणे जास्त उत्पादन देणारा मानला जातो. परंतु यंदा त्यालाही तुरा येऊ लागल्याने परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. काही ठराविक वाणांनाच तुरा येतो, अशी परिस्थिती मागील काही वर्षांत होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन आणि बदलत्या हवामानाला अनुरूप वाणांचा अवलंब केला होता. परंतु यंदा अनेक महत्त्वाच्या वाणांना अवेळी तुरे फुटल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पहावयास मिळत आहे.
शेतकऱ्यांवर तिहेरी संकट
बदलत्या हवामानाचा तडाखा, रोगराई आणि अवेळी फुटलेले तुरे या तिहेरी संकटामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. वेळेत ऊसतोड आणि पिकांच्या संरक्षणासाठी धोरणात्मक पावले उचलली नाहीत तर येत्या हंगामात जिल्ह्याच्या ऊस उत्पादनावर मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता काही जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.






