फोटो सौजन्य: Gemini
अहिल्यानगर मधील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणाने लांबल्याचे दिसत आहे. यामुळे नगर जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. नववर्षात जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ७६९ व मागील दोन वर्षापासून प्रशासक असणाऱ्या आणि निवडणुकीची प्रतिक्षा असणाऱ्या ९९ अशा ८६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील २०२४-२५ वर्षातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आधी लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडल्या. सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकामार्फत कारभार सुरू आहे.
आता त्यात नवीन वर्षात फेब्रुवारी २०२६ मध्ये जिल्हाभरातील ७६९ ग्रामपंचायतींची पाच वर्षांचा कार्यकाळ संपणार आहे. तेथे निर्धारित वेळेत नवे सदस्य निवडून येण्यासाठी डिसेंबर महिन्यातच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित आहे. परंतु सध्या नगर पालिका निवडणुकीची आणि त्यानंतर महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
या सर्व निवडणुका ३१ जानेवारीअखेर संपविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक आयोगासाठी हा कालावधी अपुरा आहे. अशा स्थितीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच फेब्रुवारी महिन्यांत मुदत संपणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायती दिग्गज नेत्यांच्या गावातील आहेत. त्यामुळे येथेही राजकीय संघर्ष अटीतटीचा असतो. सरपंच निवडही थेट मतदारांतून होणार असल्याने भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य याकडे रंगीत तालीम म्हणून पाहतात.
जानेवारी ते डिसेंबर २०२४ मध्ये मुदत संपलेल्या ८४ ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण झाला होता. तसेच जानेवारी ते डिसेंबर २०२५ मधील मुदत संपलेल्या १४ ग्रामपंचायतीच्या देखील प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे या ९९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका अगोदर होतील. शिवाय काही ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुका होणार आहेत. यानंतरव २०२६ मधील ७६८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.






