चिमूर : संक्रांतीची चाहूल लागताच पतंग उत्सावाला उधाण येत असते. यासाठी पतंग विक्रीचे दुकाने सज्ज असतात. शहरात पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून, दिवसेंदिवस आकाशातही रंगीबेरंगी पतंग गर्दी करू लागल्या आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये, यासाठी महावितरणने पतंग उडवितांना सावधगिरी बाळगा, पतंग उडवा…पण जीव सांभाळून, असे आवाहन केले आहे.
पतंग उडविण्याचा मोह लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होतो. हा मोह त्यांना टाळता येत नाही. मात्र, शहरी भागात वीज वितरणाच्या लघु व उच्चदाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते.
अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबांवर अडकतात, अशावेळी काही जण पतंग काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रसंगी अनेकदा जिवंत वीज तारेला स्पर्श होण्याची शक्यता असते. त्यामुळे अडकलेला पतंग काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतू शकतो. अशा अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन महावितरणने केले आहे.
अडकलेला मांजा काढू नका
बरेचदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही अपघात होण्याची शक्यता असते. मांजा ओढताना एका तारेवर दुस-या तारेचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट होण्याची, प्राणांतिक अपघात होण्याची, तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडू शकतो.