
एकाच कामावर दोनदा निधी टाकून पैसे केले हडप; कुडाळ ग्रामपंचायतमधील प्रकार
मेढा : कुडाळ येथे बंदिस्त गटर बांधण्याच्या एकाच विकास कामावर दोन वेळा शासकीय निधी टाकून शासनाचे पैसे हडप करण्याचा गंभीर प्रकार घडला असून, यात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सहभागी असल्याने याची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी दत्तात्रय शिंदे यांनी केली आहे. गेली दोन वर्ष दोषींवर कारवाई होण्यासाठी मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने शासकीय पैसा हडप करण्याचा प्रकार चव्हाट्यावर आणल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशाराही शिंदे यांनी दिला. सभापती सौरभ शिंदे यांच्या गावातच सरकारी पैसे हडप करण्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कुडाळ येथील या प्रकाराबाबत पत्रकार परिषद घेऊन दत्तात्रय शिंदे यांनी ग्रामपंचायत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांचा पैशाचा अपहार करण्याचा कारभार जनतेसमोर आणला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले, कुडाळ येथील विजय चिकणे घर ते धोत्रे डंबे यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटर करणे या विकास कामाला कुडाळ ग्रामपंचायतीने ग्रामनिधीमधून अंदाजे दोन लाख रुपये खर्चाला मंजुरी दिली. हे काम १७ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू करण्यात आले व ९ डिसेंबर २०२४ रोजी काम पूर्ण असल्याचे दाखवून ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले. गंभीर बाब अशी की, यानंतर याच विकास कामावर लगेच दुसऱ्याच महिन्यात १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पुन्हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून नागरी सुविधा योजनेतून ४७०००० रुपये या कामासाठी मंजूर करण्यात आले.
विशेष म्हणजे ग्रामनिधीमधून गटर बांधण्यासाठी खर्च करून सुद्धा या विकासकामावर यापूर्वी कोणताही निधी खर्च केला नाही, असे लेखी खोटा दाखला बांधकाम विभागाला ग्रामपंचायतीने दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पुन्हा याच कामावर अंदाजे पावणे पाच लाख रुपये निधी मंजूर केला असल्याचे कागदपत्रावरून दिसत आहे. मात्र, ही बाब शिंदे यांनी बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली असून, सुद्धा बांधकाम विभागाने त्याकडे डोळे झाक करून पुन्हा निधी खर्च केला आहे. आणखी विशेष म्हणजे हे गटार बांधकाम ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतच्या जागेत न करता खाजगी जागेत केले असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. दोन वेळा निधी टाकून सुद्धा हे गटर बांधकाम अपूर्ण असून, मात्र ते पूर्ण झाल्याचे दाखवून संपूर्ण बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे.
फौजदारी गुन्हे दाखल करा
सदरचे काम अपूर्ण असताना सुद्धा ते पूर्ण असल्याचे दाखवून ग्रामपंचायतीने सदर काम देखभाल दुरुस्तीसाठी आपल्या ताब्यात घेतली. याशिवाय दोन्ही वेळेला मंजुरीचा ठेकेदार वेगळा काम करणारा ठेकेदार वेगळा असा प्रकार घडला. ज्या ठेकेदारांनी हे गटरचे काम केले तो अधिकृत नाही. तसेच त्याचे करारपत्र ही केले नसल्याचा आरोप दत्तात्रय शिंदे यांनी केला शासनाचा निधी हडप करण्याच्या अजब प्रकाराची चौकशी करून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली