गणपती विसर्जन (फोटो- istockphoto)
काल म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. सर्वत्र मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. बाप्पाचे स्वागत ढोल ताशांचे वादन, मिरवणूक काढून मोठ्या आनंदात करण्यात आले. सगळीकडे आरत्यांचे शब्द ऐकू येत आहेत. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि ११ दिवस केली जाते. दरम्यान आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला मोठ्या जड अंतकरणाने निरोप देण्यात आला आहे.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात दीड दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पाला आज निरोप देण्यात आला. दीड दिवसांच्या बाप्पाचे आज जयघोषात विसर्जन करण्यात आले. दरम्यान आज दुपारनंतर गणपती विसर्जनाचा मुहूर्त होता. त्यामुळे आज संपूर्ण राज्यभरासह गणेशोत्सव प्रसिद्ध असणाऱ्या कोकणात देखील दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास १३ हजार गणपतींचे आज विसर्जन करण्यात आले. संपूर्ण राज्यभरात आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे मोठ्या जयघोषात, जड अंतःकरणाने विसर्जन करण्यात आले.