बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार; शेतकऱ्याचे नुकसान

वळती (ता. आंबेगाव ) येथील रांजणी - वळती रस्त्यावर वाळुंज मळा येथे बिबट्याने गोठ्यात शिरून एका शेळीचा फडशा पाडला. ही घटना शुक्रवारी ( दि.२५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात संबंधित शेतकऱ्याचे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले.

    आंबेगाव : वळती (ता. आंबेगाव ) येथील रांजणी – वळती रस्त्यावर वाळुंज मळा येथे बिबट्याने गोठ्यात शिरून एका शेळीचा फडशा पाडला. ही घटना शुक्रवारी ( दि.२५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात संबंधित शेतकऱ्याचे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, रांजणी – वळती रस्त्यावर वाळुंज मळा येथे रस्त्याच्या कडेला भाऊ गेनभाऊ वाळुंज यांचे घर आहे. या घराशेजारीच जनावरांचा गोठा आहे. गोठ्यामध्ये पाच शेळ्या व एक गाय नेहमी प्रमाणे बांधलेली होती. संपुर्ण गोठ्याला सात फुटी तारेचे कंपाऊंड व तारेच्यावर दोन ते तीन फुट पत्र्यापर्यंत नेट लावलेली होती. रात्री आठ ते नऊच्या दरम्यान या ठिकाणी बिबट्या आल्याचे गेनभाऊ वाळुंज व भाऊ वाळुंज यांनी पहिले.

    नेट तोडून बिबट्याच्या गोठ्यात प्रवेश

    बिबट्याला पाहून त्यांनी आरडाओरड करीत बिबट्याला तेथून पळवून लावले. भाऊ वाळुंज नेहमीप्रमाणे शुक्रवारी (दि.२५ ) सकाळी गोठ्यात शेळ्या सोडण्यासाठी गेले असता त्यांना एक शेळी ठार झाल्याचे दिसले. रात्री शेडच्या तारेच्या कंपाऊंडवरील नेट तोडून बिबट्याने आत प्रवेश करून एका शेळीचा फडशा पाडला. यात वाळुंज यांचे पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती भाऊ वाळुंज यांनी वनविभागाला दिली.