I never thought in my life that I would ever see a gold medal in the Olympiad The ecstasy of achieving double gold Grandmaster Abhijit Kunte
पुणे : ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांनी ऑलिम्पियाडमध्ये दुहेरी सुवर्ण कामगिरी केल्याचा अत्यानंद असल्याचे सांगत युवा खेळाडूंचे कौतुक केले. एकेकाळी आम्ही खेळत असताना म्हणजे तब्बल 26 वर्षांपूर्वी आम्ही ऑलिम्पियाडमध्ये खेळताना दुसऱ्या देशातील खेळाडूंच्या सह्या घेण्यासाठी पळायचो. परंतु, आताचा भारत पाहिला तर अभिमान वाटतोय, की परदेशी नागरिक आपला गुकेश आणि दिव्या देशमुखच्या सह्या घेण्यासाठी गर्दी करीत होते.
युवा खेळाडूंच्या कौतुकास्पद कामगिरीचा मोठा वाटा
बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी जे यश मिळवले त्यामध्ये युवा खेळाडूंच्या कौतुकास्पद कामगिरीचा मोठा वाटा आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असे सांगून कुंटे म्हणाले, आणखी दहा-बारा वर्षे तरी भारतीय संघाचे जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात वर्चस्व राहील अशी मला खात्री आहे. महिला संघातील खेळाडू दिव्या देशमुख ही खऱ्या अर्थाने दिव्यत्व लाभलेली खेळाडू आहे. मी तिला अकरा फेऱ्यांमध्ये तुला खेळायचेच आहे असे सांगितले होते आणि तिने हा विश्वास सार्थ ठरवीत संघास सुवर्णपदक जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला. या स्पर्धेच्या वेळी डी. गुकेश, विदित व दिव्या यांच्या सह्या आणि छायाचित्रे घेण्यासाठी अनेकजण गर्दी करीत होते यावरूनच या खेळाडूंनी लोकप्रियता मिळवली होती आहे याचा प्रत्यय येतो.
महाराष्ट्र चेस असोसिएशनकडून मानधन
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे विदित गुजराती व दिव्या देशमुख यांना प्रत्येकी तीन लाख रुपये तर ग्रॅण्ड मास्टर अभिजीत कुंटे व सहाय्यक प्रशिक्षक ग्रॅण्ड मास्टर संकल्प गुप्ता यांना दीड लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. दोघांचाही पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल तसेच पीवायसी जिमखानाचे सह सचिव सारंग लागु, आमोद प्रधान यांच्यातर्फे देखील सत्कार करण्यात आला.
सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न मी अनेक वर्ष पाहत होतो
बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न मी अनेक वर्ष पाहत होतो हे स्वप्न साकार झाल्यामुळे मला खूपच आनंद आणि अभिमान वाटत आहे असे ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने येथे सांगितले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या विदित गुजराथी व महिला संघाचे प्रशिक्षक अभिजीत कुंटे यांचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या मान्यवरांची उपस्थिती
या समारंभास महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, मानद सचिव निरंजन गोडबोले, खजिनदार विलास म्हात्रे तसेच वरिष्ठ पदाधिकारी फारुख शेख हे उपस्थित होते. महिला संघातील सुवर्णपदक विजेती दिव्या देशमुख व सहाय्यक प्रशिक्षक संकल्प गुप्ता हे या समारंभास काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांचा ऑनलाईन पद्धतीने गौरव करण्यात आला.
बुद्धिबळ ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक
बुद्धिबळ ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले यावर अजूनही विश्वास बसत नाही मात्र गेली अनेक वर्षांची तपस्या आणि त्याग याचेच हे फलित आहे असे सांगून विदित म्हणाला,” माझ्या या यशामध्ये माझ्या पालकांनी जो त्याग केला आहे त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. लहानपणी नाशिक येथे मी सात आठ वर्षांचा असताना अभिजीत कुंटे याच्याबरोबर डाव खेळण्याची संधी मला मिळाली आणि तेव्हापासूनच आमच्यामध्ये गुरु शिष्यांचे नाते तयार झाले आहे. अभिजीत दादामुळे मी घडलो असे मी अभिमानाने सांगेन. चेस ऑलिंपिक मध्ये आमच्याबरोबरच महिला संघांनी जे काही सोनेरी यश मिळवले ते अतिशय कौतुकास्पद आहे कारण दोन फेऱ्यांमधील खराब कामगिरी नंतर त्यांनी जे काही पुनरागमन केले ते खरोखरीच अतुलनीय आहे. “