
पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे (फोटो सौजन्य-ChatGPT)
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालात माहे जून ते सप्टेंबर २०२५ अखेर नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २३.९६ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. जिल्ह्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०००.३२ मिमी असून यंदा सप्टेंबर अखेर केवळ ७६५.५५ मिमी पाऊस झाला आहे. २३४.६७ मिमी एवढी पावसाची तूट नोंदविली गेली असून तुटीचे प्रमाण २३.४६ टक्के इतके आहे. त्यामुळे पिकांवरच नाहीतर भूजल पातळीवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
‘आश्वासन नको, प्रत्यक्ष मदत द्या’; प्रशासनाला शेतकऱ्यांची आर्त हाक
प्रत्येक पाणलोट क्षेत्रासाठी दोन ते तीन निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या असून सप्टेंबर अखेर या विहिरींमधील पाणीपातळीची नोंद घेण्यात आली. या नोंदीची तुलना सप्टेंबर महिन्यातील गेल्या पाच वर्षाच्या सरासरी स्थिर भूजलपातळीशी कारण्यात आली. येवला तालुक्यात ३ मीटरपेक्षा अधिक घट आढळून आली. तर चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नरमध्ये २ ते ३ मीटरपर्यंत पाणी पातळी खाली गेली आहे. तर नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये ० ते १ मीटरपर्यंत घट आहे. केवळ दिंडोरी आणि निफाडमध्येच पाणी पातळीत किचित वाढ दिसून आली आहे.
नाशिक जिल्ह्यात पर्जन्यमानातील तूट आणि भूजल पातळीमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे जलस्रोतांवरील ताण कमालीचा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे विहिरी, बोअरवेल आणि अन्य भूजलस्रोतांवर अवलंबून असणाऱ्या शेतक-यांसाठी ही स्थिती अत्यंत चिंताजनक ठरत आहे. विशेषत ज्या तालुक्यांमध्ये पावसाची २५ टक्क्यांपेक्षा अधिक तूट नौदवली गेली आहे, त्या भागातील खरीप पिकांच्या नुकसानीसोबतच आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याच्या उपलब्धतेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
अहवालानुसार नाशिक आणि बागलाण तालुक्यांमध्ये १ ते १० टक्के पावसाची तूट झाली आहे. भूजलाचा उपसा वाढल्याने आणि पावसाने ओढ दिल्याने विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. यामुळे येत्या काळात शेतीसाठीच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे.