मुंबई : राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. एकिकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत, तर अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत सगळ्यानाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, काल रात्री उशिरा मंत्रीमंडळ विस्तार व खाती वाटप याबाबत शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात दिड तास बैठक पार पडली.
राष्ट्रवादीमुळं शिंदे-भाजपाला मंत्रीपद कमी मिळणार
दरम्यान, राष्ट्रवादीच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गट व भाजपातील काही नेते नाराज असल्याचं समजते. तसेच राष्ट्रवादी काही महत्त्वाची खाती मिळणार असल्यामुळं याचा फटका शिंदे गट व भाजपाला बसणार आहे. तसेच ज्यांच्याकडे अधिक खाती आहेत, त्यांच्याकडे एक किंवा दोनच खाती राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच मंत्रीपदाची आस लावून बसलेले शिंदे गटातील नेत्यांना मंत्रीपद मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. शिंदे गटातील काही नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवार अर्थमंत्री होणार?
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १३ खाती आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ७ खाती आहेत, यात त्यांच्याकडे अर्थ, व गृहखाते आहे. यातून अर्थ खाते हे अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका असल्यानं लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी शेवटचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पातून जनतेसाठी मोठ्या घोषणा व जनतेला अमिष दाखवण्याची शेवटची संधी आहे. तसेच सध्या शिंदे गट व भाजपाकडे नऊ मंत्रिपदं आहेत, अनेक मंत्र्यांच्या खात्यामध्ये फेरबदल होणार आहे.
शिंदे गटाला किती खाती मिळणार?
दुसरीकडे मागील वर्षा राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जवळपास एक वर्ष मंत्रिपदासाठी शिंदे गटातील नेते गुडघ्याला बांशिंग बांधून आहेत, मात्र पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजून दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं शिंदे गटात नाराजी आहे. बच्चू कडू, संजय शिरसाठ, भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्यामुळं उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.