
Hingoli Politics News, Rubina Wajid Disqualification, Collector Rahul Gupta, NCP Ajit Pawar Group,
Hingoli Politics: तिसरे अपत्या असल्याच्या कारणावरून हिंगोली नगर परिषदेच्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नगरसेविका रुबीना मोहम्मद वाजीदा यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य पदासाठी अपात्र घोषित केले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी ता २४ रोजी निर्णय दिला असून, यामुळे रुबीना वाजीदा यांचे नगर परिषदेतील सदस्य पद तात्काळ प्रभावाने रिक्त झाले आहे. हिंगोली येथील प्रभाग क्र. १३ मधील रहिवासी सय्यद ताहेर सय्यद नासेर अली जुल्हा यांनी अॅड अविनाश बांगर यांच्या मार्फत नगरसेविका रुबीना वाजीद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ४४ अन्वये, कायद्याने विहित केलेल्या दिनांकानंतर तिसरे अपत्य झाल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली होती. दरम्यान जिल्हाधिकारी गुप्ता यांनी या प्रकरणाची सविस्तर सुनावणी घेतली आणि विविध वैद्यकीय पुरावे तसेच नगर परिषदेचे अभिलेख तपासले.
यामध्ये नगरसेविका रुबीना वाजीद यांना पहिले अपत्य (मुलगा) २६ ऑक्टोबर २००४ रोजी झाले. दुसरे अपत्य (मुलगी) २७डिसेंबर २००६ रोजी झाले. तिसरे अपत्य (मुलगी) २ ऑक्टोबर २०११ रोजी जन्माला आल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमातील कलम १६ (१) (के) नुसार, ज्या व्यक्तीला दोनपेक्षा अधिक मुले आहेत, ती व्यक्ती सदस्य म्हणून निवडून येण्यास किंवा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरते. या कायद्यानुसार १२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेल्या मुलांमुळे जर एकूण अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त होत असेल, तर संबंधित लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो.
नगरसेविका रुबीना वाजीद यांचे तिसरे अपत्य २०११ मध्ये जन्माला आल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे असा युक्तिवाद अॅड बांगर यांनी मांडला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले की, पुराव्यांवरून रुबीना वाजीद यांना विहित दिनांकानंतर तिसरे अपत्य झाल्याचे सिद्ध होते.
त्यानुसार नगरसेविका रुबीना मोहम्मद वाजीद यांना नगर परिषद हिंगोलीच्या सदस्य पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणात अर्जदार सय्यद ताहेर अली जुल्हा यांच्या वतीने अॅड अविनाश बांगर यांनी काम पाहिले.