सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/ अक्षय फाटक : शांतताप्रिय शहराला गेल्या ४० वर्षांपासून लागलेले गँगवारचे ग्रहण हे ‘आंदेकर’ टोळीपासून सुरू झाल्याचे दिसत आहे. वादविवादातून टोळ्यांचे म्होरके त्यासोबत त्यांचे ‘नंबरकारी’, म्होरक्यांचे आणि टोळ्यांमधील ‘महत्वाचे’ प्यादे असलेल्यांचा गेम होत आहे. गेल्या काही वर्षातील इतिहास पाहिल्यानंतर टोळी युद्धातला आणि टोळीच्या म्होरक्याचा पहिला खून हा बाळू आंदेकरचा होता. त्यानंतर पुण्यात टोळी युद्धातून अनेकांचे गेम झाल्याचे दिसत आहे.
शांतता लाभलेले आणि पेठेत वसलेले शहर म्हणून पुण्याची ओळख. पण, या पेठांमध्ये देखील गुन्हेगारी चालवली जात होती. तेव्हा वादविवादानंतर दोन गटात भांडण सायकलची चैन, तलवारी, रामपूरी चाकूने होत होते. साधारण १९८० च्या पुर्वी अवैध व्यवसायातून पुण्याच्या मध्यभागात (नाना पेठ) निर्माण झालेली पहिली टोळी बाळकृष्ण ऊर्फ बाळु आंदेकर याची टोळी होती. त्यात बाळू आंदेकर आणि प्रमोद माळवदकर हे दोघे मुख्य भूमिकेत होते. सुरुवातीला ते दोघे एकत्र काम करत होते.
मात्र, वादविवादातून प्रमोद माळवदकरने १९८० च्या दशकात वेगळे होत स्वत:ची टोळी सुरू केली. त्यानंतर मध्यभागात बाळु आंदेकर आणि प्रमोद माळवदकर या दोन टोळ्या निर्माण झाल्या. त्यांच्यात वर्चस्वातून वाद होत होते. प्रमोद माळवदकराच्या वडिलांचा खून आंदेकर टोळीने केला आणि तेथून दोन टोळ्यांमधील रक्तरंजित प्रवास सुरू झाला. माळवदकर टोळीने देखील या खूनाचा बदला घेण्यासाठी शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात बाळू आंदेकर याचा १७ जुलै १९८४ रोजी खून केला. या खूनानंतर रक्तरंजित प्रवास तब्बल १० वर्ष चालला. अनेक गुन्हेगारांचे यामधून खून झाले.
पुणे पोलीस वाढलेल्या गुन्हेगारीला लगाम लावत असताना १९९७ मध्ये पिंपरी-चिंचवडचा भाग असलेल्या काळेवाडीत प्रमोद माळवदकर याचा इन्काऊंटर केला. तेव्हा पोलीस व प्रमोद माळवदकर यांच्यात मोठी चकमक झाली होती. त्यानंतर प्रमोद माळवदकर व आंदेकर टोळीयुद्ध थांबले. मात्र, आंदेकर टोळीचे वर्चस्व या काळात मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. बाळू आंदेकर याच्यानंतर सूर्यकांत ऊर्फ बंडु आंदेकर याच्याकडे टोळीची सुत्रे आहेत.
गुन्हेगारीनंतर १९९७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकामधून आंदेकर टोळीने राजकारणात प्रवेश केला. टोळीशी निगडीत ४ लोक निवडून देखील आले. तर १९९८-९९ मध्ये वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौरही राहिल्या. वत्सला आंदेकर अक्का म्हणून ओळखल्या जात होत्या. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी गुन्हेगारीतील अंतर कमी केले. मात्र, एका खूनात सूर्यकांत ऊर्फ बंडु आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली. नंतर काही काळ मुलगा वनराज व कृष्णा हे टोळी चालवत होते. वनराज आणि कृष्णा आंदेकर या दोघांना २००९ मध्ये एकाचवेळी तडीपार केले होते.
वनराज आंदेकर याचे चुलते उदयकांत आंदेकर हे १९९२ मध्ये नगरसेवक झाले होते. वनराज आंदेकर याची आई राजेश्री आंदेकर या २००७ आणि २०१२ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. वनराज आंदेकर २०१७ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आला होता. वनराज गेल्या काही वर्षांमध्ये मात्र गुन्हेगारीपासून लांब होता. दरम्यान, बंडु आंदेकर याच्यावर मोक्का कारवाई देखील झाली आहे.
पेठेतील गुन्हेगारी शहरभर पोहचली…
पुण्याच्या पेठेतून सुरू झालेले गँगवार व गुन्हेगारी सध्यस्थितीत शहरभर पोहचली आहे. टोळी युद्ध व वर्चस्वातून वर्षाच्या सुरूवातीलाच (५ जानेवारी २०२४) कुख्यात गुंड शरद मोहोळचा खून झाला. त्यापुर्वी पुण्यात बाळू आंदेकरापासून मुकेश चव्हाण, मामा माळवदकर, संदीप मोहोळ, कुणाल पौळ, अप्पा उर्फ प्रकाश लोंढे, निलेश वाडकर यांचे खून झाले आहेत.