Photo Credit- X@KunalKamra कुणाल कामराची आणखी एक पोस्ट व्हायरल
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे शिंदेसैनिकांच्या रोषाला त्याला सामोरे जावे लागले. त्यानंतर मुंबईतील खार पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल कऱण्यात आला. दुसरीकडे मद्रास उच्च न्यायालयाकडून त्याला ७ एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मंजूरही करण्यात आला आहे. हे प्रकऱण अद्याप ताजे असतानाच आता कुणाल कामराचा आणखी एक पोस्ट केली आहे.
कुणाल कामराने केलेल्या पोस्टमध्ये सरकारवर निषेध करणाऱ्या कलाकारांना शांत करण्यासाठी पद्धतशीर मोहीम राबवल्याचा आरोप केला आहे. त्याच्या पोस्टला त्यांनी ‘लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करावी’ असे शीर्षक दिले आहे. कामरा यांनी या पोस्टमध्ये सरकारवर टीका करत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकार निषेधाचा आवाज दडपण्यासाठी विशिष्ट धोरणांचा अवलंब करते. या पोस्टमध्ये त्यांनी पाच पद्धतींचा उल्लेख केला आहे, ज्या कलाकारांना रोखण्यासाठी वापरण्यात येतात.
आक्रोश – इतका की ब्रँड्स त्यांना काम देणे थांबवतात.
अधिक आक्रोश – जोपर्यंत खाजगी क्षेत्र आणि कॉर्पोरेट्सही त्यांच्याशी संबंध तोडत नाहीत.
हिंसाचार – त्यामुळे मोठे प्लॅटफॉर्म देखील त्यांना संधी देण्यास घाबरतात.
हिंसकतेचा कळस – अगदी लहान ठिकाणेसुद्धा त्यांना प्लॅटफॉर्म देणे बंद करतात.
कलाकारांच्या प्रेक्षकांना जबाब घेण्यासाठी बोलावणे – कलेला गुन्हेगारीसारखे दाखवून लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करणे.
How to kill an Artist “Democratically” pic.twitter.com/9ESc9MZfWr
— Kunal Kamra (@kunalkamra88) April 1, 2025
कामरा यांच्या मते, या टप्प्यांद्वारे निषेध व्यक्त करणाऱ्या कलाकारांना योजनाबद्धरीत्या संपवले जाते. त्यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.या संपूर्ण प्रक्रियेनंतर कलाकारांसमोर केवळ दोन पर्याय उरतात. एक तर “तुमचा आत्मा विकून डॉलरची कठपुतळी बना. दुसरा तुमचे तोंड बंद ठेवा. ही केवळ एक रणनीती नाही, तर एक राजकीय हत्यार आहे. हे लोकांना गप्प करण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे.”
या संपूर्ण प्रकरणात कुणाल कामराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना दोन वेळा समन्स बजावले असून, त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, ते हजर राहिले नाहीत.यानंतर पोलिस थेट त्यांच्या घरी पोहोचले, पण तिथे फक्त त्यांचे पालक आढळले. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील कायदेशीर पाठपुरावा कसा होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.