File Photo : Maharashtra Assembly
धुळे : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात ‘मशाल’ नव्हेतर लोकसंग्रामच्या माध्यमातूनच उतरणार असल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. मी कुणाच्याही दारात तिकीट मागायला जात नाही, असे सांगत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाल्याचे त्यांनी नाकारले.
कल्याण भवनातील लोकसंग्रामच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार गोटे यांना आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना उबाठाच्या मशाल चिन्हावर लढणार का? अशी विचारणा केली असता त्यांनी मशाल नव्हेतर लोकसंग्रामच्या माध्यमातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी या प्रश्नी भेट झाली नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
धुळे शहरात विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या भलीमोठी असल्याबाबत लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मी निवडणुकीला उभा राहणार, जनतेला हवे असेल तर ते मला निवडून देतील. धुळे शहरात रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. धुळे मनपात पाच वर्ष भाजपाची सत्ता होती. पिण्याच्या पाण्याचा, रस्त्यांचा आणि शहर स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणे अपेक्षित होते. परंतु, मागील पाच वर्षात बकासुराला लाजवेल अशा पध्दतीने मनपा लुटून खाल्ली गेली.
आयुक्तांसह पालिकेतील अधिकाऱ्यांना मिळालं कमिशन
निर्लज्जपणाचा कळस म्हणजे महापौरांच्या निवासस्थानासमोर रस्ता काँक्रीट केला. याकामात आयुक्तांसह पालिकेतील अधिकाऱ्यांना कमीशन मिळालं. दोन महिन्यातच काँक्रीटमध्ये दखडी उचकटून बाहेर आली. भाजपच्या आबूचे अक्षरशः वस्त्रहरण झाले. कहर म्हणजे काँक्रीटीकरणावर डांबराचे थर टाकला गेला, असेही त्यांनी सांगितले.