मुंबई : रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. एकिकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत, तर अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत सगळ्यानाच उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडे शिंगे गटाची चिंता वाढली आहे. आमदार उघडपणे नाराजी बोलून दाखवताहेत. आता तर शिंदे गटातील बच्चू कडू यांनी एक मोठा इशारा दिला आहे. त्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
…तर मी वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही
दरम्यान, अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाची चिंता आणि अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळं शिंदे गटातील नेते आता उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत, संजय शिरसाठ, बच्चू कडू, भारत गोगावले व संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता तर बच्चू कडू यांनी सरकारलाच इशारा दिला आहे. एकंदरीत जे वातावरण चाललंय, राष्ट्रवादीने आमचा घात केला, राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील झाल्याने मोठी गोची झाली आहे. आमदारांना आपण सांगत होतो की, राष्ट्रवादीने आम्हाला निधी दिला नाही, कमी करण्याचा प्रयत्न केला. तीच राष्ट्रवादी आता सरकारमध्ये आहे. असं बच्चू कडू म्हणाले. माझ्या मनात आलं तर मी वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक इशारा कडूंनी दिला आहे.
दिव्यांग मंत्रालय सुरु झालं
आम्ही शिंदे सरकारसोबत आहोत. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरे यांना सोडलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाल्यानं आता निधी कसा मिळणार, आता सर्वंच निर्णय अजित पवार घेणार, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. दिव्यांग मंत्रालय सुरु झालं. एक मोठं काम झालं. माझ्याविरोधात 300 ते 350 गुन्हे दाखल झाले. हे सगळं करत असताना कित्येकदा जेलमध्ये गेलो. असं बच्चू कडू म्हणाले.