नागपूर : नागपूरच्या सभेत काल उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीका करीत त्यांना नागपूरचा कलंक म्हटले, यानंतर आता फडणवीस विरुद्ध ठाकरे वाद चांगलाच उफाळून आला आहे. दरम्यान, कलंकावरुन वातावरण तापले असून, नागपुरात याचे पडसाद उमटले आहेत. आज भाजपा युवक मोर्चाकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब उत्तर देत यावर ट्विटद्वारे आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कलंकावरुन उद्धव ठाकरेंचे कान टोचले आहेत. यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत, उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे ‘कलंकीत करंटा’ असल्याचे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे ‘कलंकीत करंटा’
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टिकेनंतर राज्यभर भाजपा आक्रमक झाली आहे. ठाकरेंच्या विरोधात जोरदार आंदोलन होत आहेत, नागपुरात साडी चोळी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत, उद्धव ठाकरेंवर बोचरी टिका करत ऐकरी भाषेचा उल्लेख केला आहे. नागुपरात पुन्हा याल तर नागपुरची जनता तुम्हाला जोडे मारेल. बोलतेवेळे विचार करुन बोला, आम्ही आमची पातळी सोडणार नाही. तुम्ही तुमची पातळी सोडू नका, यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशी टिका केली तर, आम्ही ज्या ठिकाणी बोलाल तिथे उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन करु, तुमच्यावर शाई फेकू, मातोश्रीत येऊन आंदोलन करु असा इशारा बावनकुळेंनी दिला आहे.
…तर त्याला तुम्ही जबाबदार
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण हे उद्धव ठाकरेंमुळं गेले. उद्धव ठाकरे यांचे काहीही कर्तृत्व नाही. उलट फडणवीस हे कर्तृत्वपुरुष आहेत. त्यांनी अनेक कामं केली आहेत. पण उद्धव ठाकरेंनी कोविड काळात घोटाळा केला. शेतकऱ्याचे कृषीपंप, कर्जमाफी आदी कामं बंद केलीत. यामुळं महाराष्ट्राचे खरे कलंकित करंटे हे उद्धव ठाकरे आहेत, अशी घणाघाती व बोचरी टिका बावनकुळेंनी ठाकरेंवर केली. तसेच महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडली तर याला जबाबदार उद्धव ठाकरे असतील, असं बावनकुळे म्हणाले.