महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा (फोटो - istockphoto)
नागरिकांसाठी सरकारने जारी केली ‘एसओपी’
दोन दिवस उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचा इशारा
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
पुणे: राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असताना (Pune) पुण्यातही तापमानाने धोकादायक पातळी गाठली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराचा पारा ४० अंशांच्या आसपास रेंगाळत असून उपनगरांमध्ये तो ४१ अंशांच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचा इशारा दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या चार दिवसांपासून वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सकाळी नऊ-दहानंतरच सूर्याची प्रखरता जाणवू लागते, तर दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. रस्त्यांवरून फिरताना उन्हाचे तीव्र चटके बसत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे.
मध्यवर्ती पुण्याच्या तुलनेत उपनगरांमध्ये तापमान अधिक असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही भागांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंशांचा फरक नोंदवला गेला आहे. बुधवारी ( दि. १५) शहरात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. आकाश निरभ्र राहून दिवसभर हवामान कोरडे होते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी (दि. १६) कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान १९ अंशांच्या आसपास राहील. पुढील दोन दिवस कमाल तापमान ४० अंशांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीचा उकाडाही वाढण्याची चिन्हे आहेत.
सरकारने जारी केली ‘एसओपी’
उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने मानक कार्यपद्धती (एसओपी) जारी केली आहे. विशेषतः बांधकाम, शेती व इतर मैदानी काम करणाऱ्या कामगारांसाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. यामध्ये कामाच्या वेळांमध्ये बदल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सावलीची व्यवस्था आणि ओआरएस वितरण यांचा समावेश आहे. उष्माघाताचा त्रास झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.
Nashik News : पारा ४१.४ अंशावर…! हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद, नाशिक @ ३९.५; सतर्कतेच्या सूचना
राज्यात उष्णतेची लाट येणार?
महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ आणि अन्य भागात पुढील काही दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






