
Pune rain update
यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीला सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, जुलैमध्ये या अंदाजाला छेद देत पुणे शहर आणि परिसरात दमदार पाऊस झाला. शिवाजीनगर येथील जुलै महिन्यातील पावसाने ११९ वर्षांचा विक्रम मोडला. घाट परिसरातही पावसाचा जोर राहिल्याने काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला.
ऑगस्टमध्ये मात्र पावसाने मोठी विश्रांती घेतली. महिनाभर ढगाळ वातावरण राहिले; मात्र प्रत्यक्षात पावसाच्या फारशा सरी पडल्या नाहीत. शिवाजीनगर येथे ऑगस्टमध्ये ८४.६ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १३४.७ मिलिमीटर, तर २०२४ मध्ये २७९.३ मिलिमीटर पाऊस झाला होता.
राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट
पुणे शहर आणि परिसरात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, पाऊस पूर्णपणे गायब होणार नसून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस आकाश ढगाळ राहून काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. आयएमडीनेही सप्टेंबरमध्ये देशाच्या अनेक भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
देशभरातील सप्टेंबर महिन्याची दीर्घकालीन पावसाची सरासरी १६७.९ मिलिमीटर आहे. यंदा सप्टेंबरमध्ये देशातील एकूण पर्जन्यमान एलपीएच्या ९१ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर-पश्चिम, ईशान्य, पूर्व, पूर्व-मध्य आणि दक्षिण-पूर्व द्वीपकल्पीय भारतातील काही भागांत सामान्य ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर कमी असतानाच सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानही बहुतांश भागांत सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसातील खंड आणि वाढत्या तापमानामुळे काही भागांत उष्णतेचा ताण जाणवण्याची शक्यता आहे.
सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरात तीव्र ‘एल निनो’ स्थिती असून, मध्य आणि पूर्व भागातील समुद्रपृष्ठाचे तापमान सामान्यपेक्षा अधिक आहे. आगामी काळात ही स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हिंदी महासागरात सध्या ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) तटस्थ आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार ही स्थिती सप्टेंबरपर्यंत कायम राहू शकते; मात्र आंतरराष्ट्रीय हवामान केंद्रांच्या अंदाजानुसार सप्टेंबरपासून आयओडी सकारात्मक स्थितीकडे वळण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगर येथील ऑगस्टमधील पाऊस (मिलिमीटरमध्ये)
वर्ष – पाऊस
२०१५ – २३०.५
२०१६ – १६२.२
२०१७ – ८६.८
२०१८ – २०९.४
२०१९ – २५५.७
२०२० – ४०.६
२०२१ – १६४.२
२०२२ – ४०.६
२०२३ – ४२.१
२०२४ – २७९.३
२०२५ – १३४.७
२०२६ – ८४.६
पुणे जिल्हा
ऑगस्टची सरासरी : २६७.८ मिमी
यंदाचा पाऊस : १९३.५ मिमी
सरासरीपेक्षा घट : २८ टक्के
सप्टेंबर
देशाची दीर्घकालीन सरासरी : १६७.९ मिमी
यंदाचा अंदाज : एलपीएच्या ९१ टक्क्यांपेक्षा कमी
पुणेकरांनो सावधान ! पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज
‘ऑगस्टमध्ये पुणे शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेतही कमी पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.’
– एस. डी. सानप, हवामानशास्त्रज्ञ, पुणे वेधशाळा