यवतमाळ : लाथा बुक्क्यांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ( Death) झाल्याचा दोष सिद्ध झाल्याने आरोपीला सहा वर्षे (Six years) सश्रम कारावास (Rigorous Imprisonment) व २५ हजार दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सुब्रमन्यम (Subramanian) यांच्या न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला आहे.
सुरज उर्फ गौरव बळीराम इंगळे, (नेर ता. जि. यवतमाळ) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनांक ८ मार्च २०१७ रोजी दुपारी १२.५० वाजताच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) नेर (Ner) येथे कौशल्याबाई इंगळे व त्यांचा मुलगा गौरव इंगळे याचा सोन्या पवार सोबत वाद झाला. यामध्ये गौरवने सोन्या पवार याच्या छातीवर, पोटावर बुक्क्या मारल्याने त्याचा मृत्यू झाला.
सदर घटनेची तक्रार नेर पोलिसात देण्यात आली. त्यानुसार आरोपीविरुद्ध भादंवी चे कलम ३०२ सह कलम ३४ अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती आरोपीच्या विरुद्ध जिल्हा सत्र न्यायाधीश, यवतमाळ यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.
दरम्यान, आज हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सुब्रमन्यम यांच्या न्यायालयात चालविण्यात आले. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार व डॉक्टर याची साक्ष ग्राहय मानून, दोष सिद्ध झाल्याने भादवी कलम ३०४ भाग दोन अंतर्गत आरोपीला ६ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. श्रीमती कौसल्या इंगळे हिला दोषमुक्त करण्यात आले. सदर प्रकरणामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. तर सरकार तर्फे सहा सरकारी वकील अड. नरेंद्र एन पांडे यांनी बाजू मांडली.