पुणे : सांस्कृतिक शहराच्या वारश्याला गालबोट लागल्या जाणाऱ्या “पब संस्कृतीचा” दररोजच रात्रीस खेळ चालत आहे. पबचा मात्र आवाज पोलीसांच्या कानी पडत नसल्याचे वास्तव असून पब संस्कृतीचा धांगडधिंगा पहाटेपर्यंत चालविला जात आहे. विशेष म्हणजे, त्याला स्थानिक पोलीसांचा “अंधारातून आर्शिवाद” आहे. धक्कादायक वास्तव म्हणजे, बंडगार्डनमधील काही फेमस अशा पबमध्ये “हर्बल हुक्काच्या” नावावर नुसत्या धुरकांड्या निघत असतानाही कारवाईचा टिंमटिम्या मिरवत असणाऱ्या पुणे पोलीसांना तेथे कारवाई करूशी वाटत नसल्याचे दिसत आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असताना या पब परिसरात गेल्या आठ दिवसात दोन तरुणींचा विनयभंग करण्यात आला आहे. त्यांच्या मित्रांना बेदम मारहाण झाली आहे. पहाटे अडीत व साडे तीनच्या सुमारास घडल्या आहेत. तर, पबमध्ये गेलेल्या जोडप्याला येथे खास सुरक्षेसाठी नेमलेल्या बाऊन्सरकडून बेदम मारहाण झाली आहे. परंतु, पोलीसांनी केवळ एनसीवर हे प्रकरण निभावत पबला छुपा आर्शिवाद दिला आहे.
पुण्याला सांस्कृतीक वारसा आहे. परंतु, या शहरात गेल्या काही वर्षांत पब संस्कृतीचा वारसा वाढीस लागला आहे. हे वाढत चालेले पबचे पेव आता झपाट्याने पसरले आहे. उच्चभ्रु आणि बड्या आसामींच्या दिवट्यांनी सुरू केलेल्या या धांडगधिंगाचा खेळ रात्रभर सुरू असतो अन याच ठिकाणी आता तरुणींच्या विनयभंगाच्या घटना घडू लागल्या आहेत. तर, कधी बाऊन्सरकडून मारहाणीच्या घडत असून, कधी येणाऱ्या दोन ग्रुपमध्ये मारहाणीच्या घटना घडत आहेत. पण, याकडे सुरक्षितरित्या दुर्लक्ष केले जात आहे. वेळ आलीच तर एनसीवर प्रकरण निभावले जात आहे. गेल्याच आठवड्यात याच परिसरातील पबमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या ग्रुपमधील मुलीची मध्यरात्री टोळक्याने छेड काढल्याची घटना घडली होती. यावेळी झालेल्या वादातून टोळक्याने तिच्या दोन मित्रांना बेदम मारहाण केली. पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. त्यापुर्वी पंधरा दिवसांपुर्वी एक जोपडे व त्यांच्या काही मित्र येथील एका पबमध्ये गेले होते. त्यांचे मित्र-मैत्रिण बाहेर होते. त्यांना आत सोडण्यात येत नव्हते. त्यावरून किरकोळ वाद झाला. परंतु, येथील बाऊन्सरकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. तर, महिलेला देखील धक्काबुक्की झाली. संबंधित जोडप्याने पोलीस ठाणे गाठल्यानंतर त्यांची केवळ एनसी दाखलकरून घेतली. त्यांनी मेडीकल केले होते. ते देखील पोलीसांना दिल्यानंतर दखल घेतली गेली नाही. त्यानंतर हे जोडपे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले होते. परंतु, त्यानंतरही ठोस कारवाई झाली नसल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले.
काही अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले अहो, इथ दररोज अशी प्रकरण घडतात. सतत कोणणा-कोण येत. हाणामारीच्या घटना कायमच घडत असून, दोन ग्रुप तसेच मद्याच्या नशेत वाद झाल्याच्या घटना घडत आहेत. परंतु, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पोलीसांचा याला किती आर्शिवाद आहे हे यावरून दिसत आहे. स्थानिक पोलीस मॅनेज असल्यानेच बाऊन्सरकडून मारहाण, दादागिरी तसेच येथील प्रकरण खासगीत मिटली जातात. एखादे प्रकरणच दाखल होत असल्याचे कळते.
पब म्हणजे काय…
पंचतारांकित हॉटेलात तरूणाईला थिरकण्यासाठी पब हे गोंडस नाव देऊन एक स्वतंत्र विभाग केलेला असतो. मद्य, हुक्का, मोठ्या आवाजात गाणे असतात. त्यावर तरुणाई मद्याच्या नशेत थिरकते. तसेच सिगारेट पिण्यास एक स्वतंत्र खोली देखील असते. प्रवेशासाठी खास व्यवस्था असते. मुलगी सोबत असणे ही यांची पहिली अट असते. एकट्या तरुणाला येथे प्रवेश नसतो. पबचा धांगडधिंगा रात्री खऱ्या अर्थाने बाराला सुरू होतो आणि पहाटे चारपर्यंत सुरू असतो. दहापासूनच येथे रागां लागतात. पण, तरुणाईच्या आनंदाला इथे बारानंतर पारा चडतो.
हुक्क्याचा नुसता धुर्र…
विकेंडमध्ये हजारोंच्या संख्येने तरूणाई मद्याच्या नशेत थिरकत आहे. दिवसेंदिवस हे चित्र आता भयावह होत चालले आहे. काही वर्षांपुर्वी पबमध्ये कर्रर्रकश आवाजात मद्याचा घोट घेऊन थिरकले जात होते. पण, आता कर्रर्रकश आवाज अन मद्याच्या घोटासोबतच पब चालकांनी हर्बल हुक्याच्या नावावर हुक्का देखील पुरविण्यास सुरूवात केली आहे. तर अनेकवेळा बाथरूममध्ये अमली पदार्थांचे देखील सेवन होत असल्याची खात्रीलायक माहिती येथे अधून-मधून येत असणाऱ्या तरूणांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस याकडे का दुर्लक्ष करतात असा प्रश्न आहे.
टुबीएचके पबच्या पार्किंगमध्ये तरुणीसोबत अश्लील कृत्य
पुणे, बंडगार्डन परिसरात असणाऱ्या टुबीएचके हॉटेलच्या (पब) पार्किंगमध्ये तरुणीसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर तरुणीच्या मित्रांनी विरोध केला असता त्यांना मारहाणकरून शिवीगाळ केली. १३ मार्च रोजी ही घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओहनसिंग सहानी यातरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी तिच्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी आली होती. जेवण केल्यानंतर ती व तिचे मित्र टुबीएचके हॉटेलच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत थांबले होत्या. यावेळी त्यांच्या बाजूला आठ ते दहा जणांमध्ये भांडण सुरू होते. ते भांडण सुरू असतानाच त्यातील ओहनसिंग हा तरुणीच्या जवळ आला. त्याने तरुणीचा डावा हात धरून त्यांना जवळ ओढले आणि अश्लील कृत्य केले. तरुणीच्या मित्राने त्याला विरोध केला असता त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक गोरड हे करत आहे.