फोटो सौजन्य: Gemini
अहिल्यानगर जिल्ह्यात २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत, आदिवासी विकास विभागाच्या वतीने विद्युत विकास या मुख्य शीर्षकाखाली आदिवासी उपयोजना (TSP) आणि उपयोजनाबाह्य (OTSP) क्षेत्रांमध्ये ग्रामीण विद्युतीकरण व पद्धती सुधारणा कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याच योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यातील जांभूळवाडी आदिवासी वस्तीचा समावेश करण्यात आला असल्याचे झावरे पाटील यांनी स्पष्ट केले.
आजवर वीज सुविधेपासून वंचित राहिलेल्या या वस्तीतील आदिवासी बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शिक्षण, आरोग्य सेवा, दैनंदिन कामकाज तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने वीज ही मूलभूत गरज असतानाही, अनेक दशकांपासून या वस्तीला अंधारातच जीवन जगावे लागत होते.
या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले. मंजूर निधीमुळे आता प्रत्यक्ष विद्युतीकरणाचे काम मार्गी लागणार असून, यामुळे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.
“सुजित झावरे पाटील यांच्यामुळे आता आम्ही खऱ्या अर्थाने उजेडात येणार आहोत,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.
आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगत, यापुढेही वंचित घटकांसाठी कार्य सुरूच राहील, असे झावरे पाटील यांनी स्पष्ट केले. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर या परिसरातील आरोग्य सेवा, मोबाईल नेटवर्क, घरगुती उद्योग तसेच लघुउद्योगांना चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.






