मंगळवेढा : बठाण येथील समर्थ कृषी केंद्रात २५ पोती डमी खत साठा आढळल्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी पूर्ण झाली असून याचा अहवाल नुकताच जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती कृषि विभागाचे गुण नियंत्रक अधिकारी विनायक तवटे यांनी दिली.
बठाण येथील समर्थ कृषी केंद्रात डमी खत विक्री होत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने कृषी विभागाकडे केली होती. यावर संबंधित अधिकार्यानी भेटी देवून खताच्या २५ बॅगा ताब्यात घेवून त्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. याचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये फक्त एनपीकेच्या ४ टक्के मात्रा आढळल्या असून ९६ टक्के खत हे बोगस असल्याचे प्रसार माध्यमाना सांगण्यात आले. या घटनेनंतर खत विक्रीला मनाई करून निलंबन करण्यात आले होते.
तपासात जुन्या बॅगा आढळल्या
पंचनामा करून बॅगाची तपासणी केल्यानंतर बॅगा जुन्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती कृषी विभागाचे गुण नियंत्रण अधिकारी विनायक तवटे यांनी ही कारवाई केली. तालुक्यातील खताबाबत शेतकऱ्यांना शंका आल्यास त्यांनी थेट पंचायती समितीच्या कृषी विभाग अथवा तालुका कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टाळाटाळ करणाऱ्यावर कारवाई
या संपूर्ण घटनेचा अहवाल जिल्हा प्रशासनास दि. ७ ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आला असून चालू आठवडयात संबंधितावर फौजदारी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने युरियाचा २ हजार १३ मे. टन, १८: ४६ खत १९५ मे. टन, सिंगल सुपर फॉस्पेट ८९२ मे. टन उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. काही दुकानदाराकडून शेतकऱ्यांना मागणीनुसार युरिया देण्यात टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. जे दुकानदार शेतकऱ्यांना खत देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई कृषी विभाग करणार असल्याचे सांगण्यात आले.