स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच राजकीय पक्षांतराचे वादळ; एकामागोमाग अनेक नेते सोडत आहेत पक्ष
सासवड/ संभाजी महामुनी : पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जगताप काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाने पुरंदरला मोठी ताकद मिळणार असून, राजकीय गणिते पूर्णपणे बदलणार आहेत. दरम्यान जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास पुरंदरमधील काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
पुरंदर तालुक्यातील काँग्रेस पक्षावर माजी आमदार संजय जगताप यांच्या कुटुंबियांची मोठी पकड आहे. दिवंगत आमदार चंदुकाका जगताप यांची संपूर्ण हयात काँग्रेसमध्येच गेली. त्यांना पुरंदर विधानसभा निवडणुकीत प्रयत्न करूनही यश मिळविता आले नाही. मात्र तरीही काँग्रेसवरील त्यांनी निष्ठा संपूर्ण हयातभर ठेवली होती. विविध राजकीय पक्षांनी त्यांना पद्धतशीरपणे बगल देण्याचे काम केले. त्यानंतर संजय जगताप यांनीही यापूर्वी सलग दोन निवडणुकीत विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्याकडून पराभव पत्करला, मात्र तरीही नाउमेद न होता पक्षावरील निष्ठा कायम ठेवून पक्षात सक्रीय राहिले.
दरम्यानच्या काळात विजय शिवतारे निवडून आल्यानंतर शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांवर टीकेची अक्षरशः झोड उठवली होती. आणि त्यांना रोखणे आवश्यक असल्याने स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांच्या प्रचारात उडी घेतली. तू कसा निवडून येतो तेच बघतो, असे म्हणत शिवतारे यांना दिलेले आव्हान पवार यांनी खरे केले. पवार यांच्या या वाक्याने इतिहास निर्माण केला आणि संजय जगताप निवडून आले. २०२४ च्या निवडणुकीत संजय जगताप यांना पुन्हा निवडून येण्याची संधी होती, मात्र माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी शरद पवार यांच्याकडे उमेदवारीसाठी आग्रह धरला, पक्षाने उमेदवारी न दिल्यास वेळप्रसंगी शरद पवार विचारमंचच्या वतीने निवडणूक लढविणार अशी घोषणाच केली. त्याचवेळी राज्यातील समीकरणे बदलली होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे स्वतंत्र गट होऊन महायुती स्थापन झाली होती. लोकसभा निवडणुकीत शिवतारे पवार यांचावर नाराज असतानाही महायुतीचा धर्म पाळत सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे शिवतारे यांच्या विरोधात भूमिका घेणे अजित पवार यांना शक्य नव्हते.
काँग्रेसचा उमेदवार पराभूत करणे पवार यांना महत्वाचे असल्याने शरद पवार यांनी नकार देताच शेवटच्या क्षणी अजित पवार यांनी संभाजीराव झेंडे यांना उमेदवारी देऊन मतांचे विभाजन करण्यात अप्रत्यक्षपणे हातभार लावला. त्यामध्ये संजय जगताप यांना मोठा फटका बसला आणि पराभवाला सामोरे जावे लागले.
सासवडमध्ये होणार जाहीर प्रवेश?
दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पुणे जिल्ह्याच्या भोर मतदार संघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनीही निवडणुकीनंतर भाजपचे कमळ हातात घेतले होते. काँग्रेसला ताकद देणाऱ्या जिल्ह्यातील बहुतेक नेत्यांनी भाजपला साथ दिल्याने सध्यस्थितीत पुरंदरमधून संजय जगताप हेच जिल्ह्यातील पक्षाची धुरा सांभाळत होते. मात्र गेल्या काही दिवसापासून पक्षामध्ये अस्वस्थ असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे अखेर भाजपचे कमळ हाती घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, येत्या आठवडाभरात सासवडमध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे-मिरज रेल्वे दुहेरी मार्ग कार्यन्वित; शिंदवणे घाटमाथ्यावरून धावली डबल रेल्वे
काँग्रेस पक्षच निराधार होण्याची भीती
पुरंदर काँग्रेसवर जगताप परिवाराची मोठी पकड असून, शिवसेनेच्या विरोधात बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटातील सदस्य व दोन पंचायत समिती सदस्य निवडून आणले होते. सासवड नगरपरिषदेवर अनेक वर्षे एकहाती सत्ता असून राष्ट्रवादीतील गटबाजीचा फायदा घेत जेजुरी नगरपरिषद मागील पंचवार्षिक निवडणुकीत ताब्यात घेण्यात यश मिळवले होते. सहकार, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रात त्यांची मोठी पकड असल्याने अनेक गावच्या विकास सोसाट्या, ग्रामपंचायती. दूधसंघ, नीरा बाजार समिती, खरेदीविक्री संघ यावर त्यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे जगताप यांच्यासोबतच संपूर्ण पक्षच भाजपला मिळणार आहे. याचा थेट परिणाम काँग्रेसवर होणार असून तालुक्यातील काँग्रेस पक्षच निराधार होण्याची भीती आहे.
विजय शिवतारेंसमोर आव्हान उभे राहणार
येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका येत असून, संजय जगताप यांच्या माध्यमातून अनेक वर्षे पुरंदर तालुक्यात सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला त्याचा फायदा होणार आहे. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपला जगताप यांच्या मदतीने प्रवेश मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. महायुतीमधील शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्या समोर भाजपचे अंतर्गत आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे संजय जगताप आणि विजय शिवतारे यांच्यातील राजकीय वर्चस्ववादाचा दुसरा अंक लवकरच पाहायला मिळणार हे नक्की.