शिर्डी: स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक (Local Governing Body Election) लढविण्यासाठी कोणत्या पक्षाशी आघाडी करावी किंवा स्वबळावर लढावे, याचा निर्णय स्थानिक पातळीवर पदाधिकार्यांनी घ्यावा, अशी भूमिका घेण्यात आली आहे. स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी पण पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राधान्य महाविकास आघाडीलाच आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. शिर्डी येथील मंथन शिबिराच्या दुसर्या दिवशी ते माध्यमांशी बोलत होते.
[read_also content=”चंद्रकांत खैरेंनी दिले महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे संकेत, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/chandrakant-khaire-statement-about-shinde-fadanvis-government-nrsr-341932.html”]
राज्यातील साखर कारखान्यांमधून साखर निर्यात बंदीची मर्यादा घालण्यात आली आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांना अधिक कोटा देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कारखान्याला अतिरिक्त साखर निर्यात करायची झाल्यास उत्तर प्रदेशातील कारखान्यांकडून अतिरिक्त कोटा विकत घ्यावा लागेल. या चुकीच्या निर्णयाकडे शुगर फेडरेशन आणि साखर कारखाना संघाने केंद्र सरकारचे लक्ष वेधले पाहिजे, असेही पाटील म्हणाले.
सीमाप्रश्नावर तोडगा निघावा
महाराष्ट्र व कर्नाटकात आता भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे सीमाप्रश्न सोडविणे त्यांना शक्य आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. राज्यापालांच्या संयुक्त बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
अजित पवार अनुपस्थित
पक्षाच्या शिबिराला पहिल्या दिवशी हजेरी लावल्यानंतर अजित पवार शिर्डीतून निघून गेले. शिबिराच्या दुसर्या दिवशी ते अनुपस्थित होते. याबाबत जयंत पाटील यांनी माहिती दिली. अजित पवार त्यांच्या आजोळी एका कार्यक्रमानिमित्त गेले आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी परवानगी घेतली आहे. त्यामुळे कुठलीही उलटसुलट चर्चा त्यांच्या अनुपस्थितीबाबत होऊ नये, असे जयंत पाटील म्हणाले.