कमल व्यवहारेंची काँग्रेसला सोडचिट्टी! धंगेकरांची डोकेदुखी वाढली?
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये नाराजी उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपमधून रासने यांना उमेदवारी मिळाल्यानंतर कुणाल टिळक आणि धीरज घाटे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कमल व्यवहारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत बड्डांचे निशान फडकवले आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात धंगेकर विरुद्ध रासने असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार हे निश्चित झाला आहे. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भाजपने रासनेंना त्यांच्या विरोधात मैदानात उतरवले आहे. रासने यांना उमेदवारी दिल्याने भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धीरज घाटे यांनी फेसबुक वर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. फेसबुक पोस्टमध्ये धीरज घाटे म्हणाले, तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवय पण तीस वर्ष हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय शब्दात घाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडे कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची देखील डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या कमल व्यवहारे यांनी पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवत आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. कमल व्यवहारे यांचे सध्या एक पत्रक व्हायरल होत आहे. त्यामध्ये 10 वर्षात 5 पक्ष बदलून आलेली मंडळी पक्षापेक्षा स्वतःला मोठी समजू लागल्याचा फटका लोकसभेला बसला, आता त्यांना कसबा विधानसभेचे उमेदवारी देण्यात आलं असल्याचं म्हणत कमल व्यवहारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान कमल व्यवहारे या काही दिवसांपूर्वी संभाजी राजे छत्रपती यांच्या भेटीला गेल्या होत्या त्यामुळे त्या तिसऱ्या आघाडीच्या उमेदवार होऊ शकतात अशा चर्चा आहेत. तस न झाल्यास त्या अपक्ष म्हणून देखील निवडणूकीला रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.