
माजी आमदार सुरेश लाड यांचे अनोखे आंदोलन (फोटो सौजन्य - संतोष पेरणे)
कर्जतः कर्जत तालुक्यातील कल्पतरू बिल्डरला जमिनी न दिल्याने त्यांना धमकावणे जात आहे.अशा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी माजी आमदार सुरेश लाड यांनी आज सकाळी कर्जत पोलिस ठाण्याच्या पायरीवर आंदोलन सुरू केले आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक येत नसल्याने सुरेश लाड यांनी आपला मुक्काम कर्जत पोलीस ठाण्याच्या पायऱ्यावर कायम ठेवला आहे. दरम्यान, सुरेश लाड यांनी आपले अंथरूण पांघरून आणून आजची रात्र पोलिस ठाण्याच्या पायरीवर घालवण्याचा निर्धार केला आहे.
का चालू आहे आंदोलन
कर्जत पळसदरी खोपोली रस्त्यावर पळसदरी ग्रामपंचायतमध्ये उभ्या राहत असलेल्या कल्पतरू बिल्डर कडून स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी मिळविण्यासाठी दडपशाही सुरु केली आहे. शेतकऱ्यांना मागील दोन तीन महिन्यापासून धमक्या येत असून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या नसल्यातरी त्या जमिनीमध्ये कल्पतरू बिल्डर कडून घुसखोरी करून सीमाबांदी करण्यात आली आहे. त्याविरूद्ध कर्जत पोलीस ठाणे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याने माजी आमदार भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी सुरेश लाड यांनी आज सकाळी कर्जत पोलीस ठाण्याच्या पायरीवर आंदोलन सुरु केले.
तेथे वृत्तपत्र टाकून त्यावर झोपून आपले आंदोलन सुरु करताना सकाळी अहंकारा वाजता रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे कर्जत येथे येत नाही तोवर आपले आंदोलन सुरूच राहील असे जाहीर केले होते. त्यानंतर दुपारी चार वाजता जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे हे कर्जत येथे पोहचले.
सहकाऱ्यांची साथ
जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिवतारे हे कर्जत येथे पोहचले त्यावेळी आणि सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरेश लाड हे जमिनीवर झोपूनच आपले आंदोलन करीत होते. मात्र त्या नंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सुरेश लाड यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाची सावितर माहिती घेतली. त्या सर्व काळात भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी,जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे,जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर,भाजप तालुका अध्यक्ष राजेश भगत,भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे,जिल्हा अध्यक्ष अतुल बडगुजर,जिल्हा भाजप फ्रेंड्स संयोजक नितीन कांदळगावकर,भाजप सोशल मीडिया संयोजक गायत्री परांजपे,माजी नगराध्यक्ष राजेश लाड,शरद लाड,भाजप तालुका सरचिटणीस वसंत महाडिक,दिनेश भरकले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सुरेश लाड यांच्या सोबत बसून आहेत.
Poladpur News: कशेडी बोगदा लवकरच पूर्ण करण्यासाठी देणार प्राधान्य, शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे आश्वासन
सुरेश लाड ठाम
कर्जत पोलीस ठाणे आणि येथील अधिकारी शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय देण्याची शक्यता नाही आणि त्यांच्याकडून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही याची आपल्याला खात्री आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे जोवर कर्जत येथे येत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत नाही तोवर आपले आंदोलन सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे मध्यस्थी साठी कर्जत येथे पोहचलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्या भेटीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्याचवेळी आठ वाजले तरी सुरेश लाड यांचे आंदोलन सुरूच होते.
Raigad News: पर्यावरण प्रेमींचा स्तुत्य उपक्रम ; प्लॅस्टिकमुक्त माथेरान करण्याची शासनाकडे मागणी
तर पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर….
माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला आहे.त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या सोबत बैठक झाल्यावर आंदोलन मागे घेण्याचे जाहीर केले आहे.सुरेश लाड यांची भूमिका समजून घेण्यासाठी जिल्हा पोलिस अध्यक्ष रात्री दहा पर्यंत आलेले नाहीत.त्यामुळे सुरेश लाड यांनी आपल्या घरी कार्यकर्ते पाठवून आपले अंथरूण पांघरून मागवून घेतले.
त्यांनंतर त्यावर शांत झोप घेण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी वृत्तपत्र तर सायंकाळी सतरंजी आणि आता रात्री अंथरूण पांघरून यासोबत माजी आमदार सुरेश लाड यांनी पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर आंदोलन कायम ठेवले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी माजी आमदार सुरेश लाड हे कर्जत पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर झोपणार आहेत. अशी घटना राज्याच्या इतिहासात पहिलीच असल्याचे बोलले जात आहे.