कर्जतमध्ये वृक्षतोड पाहून सयाजी शिंदे संतापले! (Photo - X)
कर्जत : कर्जतमधील सायडोंगर येथे टोरंट प्रकल्पानिमित्त झालेल्या वृक्षतोडीवरून झालेला वाद काही सामन्याचा नाव घेत नाही आहे. कर्जतमधील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विरोधकांनी वृक्षतोडीवरून आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारला घेरलं आहे. वेगवेगळ्या स्तरावरून वृक्षतोडीला विरोध सुरूच असून अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. (Karjat Saidongar Deforestation)
यावेळी त्यांनी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. “हजारो झाडांची कत्तल होत असताना पर्यावरणमंत्री शांत का आहेत? मंत्र्यांना खातं देताना त्यांना खात्याचं ज्ञान आहे का हे पाहणं गरजेचं आहे,” असं ते यावेळी म्हणाले.
विकासाच्या नावाखाली हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असेल, तर पर्यावरणाचं रक्षण करणार कोण? असा सवाल उपस्थित करत सयाजी शिंदे यांनी कर्जतमधील वृक्षतोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्जत तालुक्यातील पालीतर्फे कोतवाल खलाटी येथील सायडोंगर परिसरात सुरू असलेली वृक्षतोड पाहिल्यानंतर त्यांचा संताप अनावर झाला. यावेळी कर्जत पर्यावरण बचाव समितीचे समन्वयक अॅड. कैलास मोरेही उपस्थित होते.
झाडं तोडली जातात, पण त्यांच्या मृत्यूवर कुणी शोकसभा घेत नाही, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली. ही झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात. त्यामुळे या ठिकाणी झाडांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
सायडोंगर परिसरातील जुन्या झाडांवर जवळपास 80 प्रकारचे पक्षी राहत असल्याचा दावा शिंदे यांनी केला. झाडांची कत्तल झाल्यामुळे पक्ष्यांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या प्रजनन काळाचाही विचार केला गेला नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
झाडांवर अवलंबून असलेली जैवविविधता नष्ट झाली, तर पक्ष्यांच्या अन्नसाखळीवरही परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. जंगलतोड करून प्रकल्प उभारण्यापेक्षा पर्यावरणाचं रक्षण महत्त्वाचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
सरकार कोट्यवधी झाडं लावल्याचा दावा करतं, मग ती झाडं नेमकी कुठे आहेत, असा सवाल सयाजी शिंदे यांनी उपस्थित केला. सूर्यप्रकाश आणि निसर्गाची ऊर्जा मोफत उपलब्ध असताना जंगलांचा नाश करून विकास साधण्याची गरज काय, असाही प्रश्न त्यांनी विचारला. प्रकल्पग्रस्त म्हणून स्वतःलाही चौकीदाराची नोकरी करावी लागल्याचा अनुभव सांगत त्यांनी रोजगाराच्या आश्वासनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
या वृक्षतोडीवरून राज्यात वातावरण तापलं असतानाच महायुतीतदेखील एकमत नसल्याचं दिसत आहे. शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांच्यात झालेल्या वादावरून हे स्पष्टदेखील झाले.
महेंद्र थोरवे यांनी प्रकल्पाच्या बाजूने भूमिका मांडली असून या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल असं म्हंटल आहे. दुसरीकडे, राष्ट्र्वादीच्या सुधाकर घारे यांनी वृक्षतोड आणि स्थानिकांच्या प्रकल्पास असलेल्या विरोधाला लक्षात घेत प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अश्यातच, आता सयाजी शिंदे यांनी थेट राज्य सरकार आणि पर्यावरणमंत्र्यांवरच निशाणा साधल्याने चर्चाना उधाण आले आहे.
अखेर, राज्यात दुष्काळी परतस्थिती असल्यामुळे तसेच पर्यावरणावरून वृक्षतोडीच्या निषेधार्थ यंदा दिवाळी साजरी करू नका, असं भावनिक आवाहन शिंदे यांनी नागरिकांना केलं. सायडोंगरातील वृक्षतोडीचा मुद्दा आता पर्यावरणाच्या चर्चेसोबतच स्थानिक आंदोलनाचाही विषय बनला आहे.
Ans: कर्जत तालुक्यातील पालीतर्फे कोतवाल खलाटी येथील सायडोंगर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीचा सयाजी शिंदे यांनी निषेध केला.
Ans: हजारो झाडांची कत्तल सुरू असताना पर्यावरण मंत्री गप्प असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला. मंत्र्यांना त्यांच्या खात्याची माहिती असणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.
Ans: वृक्षतोड रोखण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच झाडांच्या कत्तलीच्या निषेधार्थ यंदा दिवाळी साजरी करू नका, असंही ते म्हणाले.






