File Photo : Khadakwasla Dam
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या मुसळधार पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरिपीट उडाली. काल रात्रीपासून होत असलेल्या तूफान पावसाने पुण्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे पुण्यातील धरणांची स्थिती सुधारत आहे. खडकवासला धरण पूर्णत: भरले असून, धरणातून विसर्ग सुरु आहे.
पुण्यात होणाऱ्या या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत अक्षरश: गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी आले आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील 5 सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.
मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलेले आहे. तर रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली. शर्थीचे प्रयत्न करत चाकरमानी आपल्या कामाच्या ठिकाणी आणि कार्यालयात पोहचत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये पावसाने तूफान बॅटिंग केली आहे.
पुण्यातील भिडे पूल गेला पाण्याखाली
पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील विसर्ग सुरू केला आहे. काल रात्री भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्तीत पाणी शिरले आहे. संगम पूल पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे. पुणे महापालिकेसमोर असलेला पूल बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खडकवासला धरण फुल्ल तर टेमघर 57 टक्क्यांवर
या मुसळधार पावसामुळे पुण्यातील धरणसाठा भरत आहे. त्यात खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. तर टेमघर 57 टक्के, वरसगाव 63 टक्के तर पानशेत 76 टक्क्यापर्यंत भरले आहे. त्यामुळे आता पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटेल असे सांगितले जात आहे.