
"सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर...": महायुती फुटणार? 'या' नेत्याच्या विधानाने खळबळ
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजले
महायुती एकत्रित लढणार की स्वतंत्र याकडे सर्वांचे लक्ष
कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता
इचलकरंजी: महानगरपालिका निवडणूकीतील जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करा. जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. सर्वांनी एकदिलाने कोल्हापूर महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवावा, असे आवाहन राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीतील मेळाव्यात बोलताना केले.
महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. यावेळी नामदार मुश्रीफ यांनी, यापूर्वी नगरपालिका निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घवघवीत यश संपादन करतानाच माजी आमदार अशोक जांभळे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत जाण्याची किमयाही केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणूकीतही यश निश्चित मिळेल. काहीजण पक्षातून गेले म्हणून पक्षाची ताकद कमी झाली अशा भ्रमात असतील तर ते चुकीचे ठरतील.
इचलकरंजी हे कामगारांचे शहर असून त्यांच्या श्रमाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न संपविण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. कागलच्या धर्तीवर इचलकरंजीतील कामगारांना 10 हजारात स्वप्नातील घरकुल देण्याचा आमचा प्रयत्न राहिल. तर लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाचे असलेले अनुदान 2100 करतानाच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ होण्यासाठी अडचणीच्या ठरत असलेल्या तांत्रिक बाबी लवकरच दूर होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. स्वागत करुन प्रास्ताविकात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी, महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. त्यासाठी आम्हाला मुश्रीफसाहेबांनी हिमालयाची ताकद द्यावी, असे आवाहन केले.
स्थानिक आघाड्यांमुळे गुंतागुंत
जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच ठिकाणी राजकीय घडामोडी वेगाने बदलू लागल्या आहेत. सत्ताधारी, विरोधक, आणि स्थानिक गटांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रत्येक नगरपरिषदेचे चित्र वेगळे असून स्थानिक आघाड्यांमुळे गुंतागुंतीचे चित्र दिसत आहे.कुरुंदवाड नगरपरिषदेवर गेल्या कार्यकाळात राष्ट्रवादीचा प्रभाव राहिला असला तरी शिंदे गटाने गेल्या दोन वर्षांत संघटनशक्ती वाढवली आहे.
भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढल्यास राष्ट्रवादीला मोठं आव्हान निर्माण होईल. या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढतीची शक्यता आहे.मलकापूरमध्ये ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष, भाजपा, प्रभावळे, भोसले आघाडी, शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढत होणार आहे. पन्हाळ्याचा पारंपरिक गड राखण्याची लढाई या ठिकाणी सुरू आहे. भाजप, जनसुराज्यशक्ती पक्ष मोकाशी गट, भोसले गट, गवंडी, सोरटे, कांबळे गट, अशा लढतीची शक्यता आहे.